A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वेड लागलं

दिसलीस वार्‍यामध्ये
आपुल्याच तोर्‍यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या-
काळ्याभोर डोळ्यांमध्ये.. वेड लागलं..

काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
रणरण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या.. वेड लागलं..

हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ? कोण धरा? झाडा नाही भान
जशी काही पाखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे- 'ये न माझ्या घरट्यात नीज'.. आता वेड लागलं..

पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी, बोलतो मी, चालतो मी असा
वार्‍यावर उमटतो अलगद ठसा.. आता वेड लागलं..

खुळावले घरदार, खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली आग अशी झणाणली काया
जीव असा खुळा त्या विषाचीच माया.. आता वेड लागलं..

मला ठाव वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यांतून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उफराटी त‍र्‍हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा.. आता वेड लागलं..
गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर- संदीप खरे
अल्बम - आयुष्यावर बोलू काही
गीत प्रकार - कविता, नयनांच्या कोंदणी
चिरा - बांधकामाचा दगड.

 

Print option will come back soon