A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वेध तुझा लागे

वेध तुझा लागे सतत मनी । वसतिच केली नामे वदनी ॥

जगत सकल सखि भासत त्वन्मय । मधूर रूप तव खेळे नयनी ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- राम फाटक
नाटक - एकच प्याला
राग - बिहाग
ताल-त्रिवट
चाल-टेर सुनीपाये
गीत प्रकार - नाट्यसंगीत
गडकर्‍यांच्या नाटकांचा नशा

"गडकर्‍यांच्या नाटकांनी एक नशा चढवली होती आमच्यावर. उर्दू शेर शायरीतील प्रणयाची उत्तान वर्णनं, सौंदर्यासक्ति, भावनांचा उत्कट आविष्कार, गडकर्‍यांनी आपल्या असाधारण भाषाशैलीने, अलगद उचलून मराठीत आणला. तरुण मनाला हा शृंगार अतिशय रुचला." शास्त्री सांगतात.

शास्त्री एक शेर म्हणून दाखवत-
"तेरे रुखसारे ताबांपर यह नन्हासा नहीं तिल है ।
किसी आषिक का जलभून कर सिमटकर रह गया दिल है ।"

भावबंधन नाटकांत प्रभाकर, लतिकेच्या सौंदर्याचं अत्यंत काव्यमय, रसभरीत असं वर्णन करतो, आणि मग उर्दू शायरीच्या धर्तीवर पुढं म्हणतो, "आणि तुझ्या गालावरचा हा तीळ !
तुझ्या रूपाने साक्षात सौंदर्य, साक्षात काव्य साकार झालं, काही उणेपणा राहिला नाही, म्हणून जणुं काय विधात्याने इथे पूर्णविराम घेतला."

राजसंन्यास नाटक गडकर्‍यांनी पूर्ण केलंच नाही. ते अर्धवट स्वरूपांतच रंगभूमीवर दाखवलं जाई. पण ह्या नाटकातला रस-परिपोष उत्कटतेच्या इतक्या शिगेला पोहोचत असे, की प्रेक्षकांच्या मनांत, त्यांच्या नकळत, नाटकावर पूर्णत्वाचा साज चढविला जाई.

शेक्सपिअरने छत्तीस नाटकं लिहिली. "आपण निदान अठरा नाटकं लिहावी," हा गडकर्‍यांचा मानस होता. ह्या अठरा पैकी पांच नाटके, पांच निरनिराळ्या संन्यासांशी संबंधित, अशा कथानकांवर उभारायची ही त्यांची योजना होती. प्रेमसंन्यास, राजसंन्यास, पुण्यप्रभाव हे कर्मसंन्यासावर आधारलेलं नाटकं. शस्त्रसंन्यासावरील आधारलेलं 'शून्य संन्यास' हे नाटक गडकरी लिहिणार होते. राजसंन्यास, 'वेड्यांचा बाजार', ही नाटकं निदान अर्धी लिहून झाली होती. 'शून्य संन्यास' मात्र गडकर्‍यांच्या मृत्यूने शून्यात विलीन झालं.

गडकर्‍यांच्या नाटकांबद्दल शास्त्री, स्वतःचा असा एक अभिप्राय व्यक्त करीत. आपल्या नाटकांतून गडकर्‍यांनी विफल प्रेमाच्या ज्या शोकांतिका दाखवल्या आहेत, त्या प्रत्येकीचं स्वतःचं असं एक वैशिष्ठ्य आणि वैचित्र्य आहे. 'वेड्यांच्या बाजार'मधला बाळाभाऊ, 'भावबंधन'मधला घनःश्याम, 'प्रेमसंन्यास'मधला कमलाकर, 'पुण्यप्रभाव'मधला वृंदावन आणि भूपाल, 'एकच प्याल्या'मधला रामलाल, ह्या सगळ्यांच्याच वाट्याला प्रेमभंगांचं दुःख आलेलं आहे. पण प्रेमभंगाचं दुःख पचवण्याची प्रत्येकाची तर्‍हा वेगळी, ताकद वेगळी ! विफल प्रेमाच्या अनुभवाच्या ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ह्या प्रेमिकांच्या मनावर घडून आल्या, त्या त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावधर्मानुसार घडून आल्या. ह्या स्वभावधर्मांची उकल करून दाखवण्याचं एक कार्य, गडकर्‍यांना ह्या नाटकांद्वारे साधायचं होतं.

गडकर्‍यांच्या भावबंधनातली 'लतिका', लोकांना फार आवडली. दीनानाथाला पुढे ठेवून गडकर्‍यांनी 'लतिके'ला घडवलं. दीनानाथांच्या सहवासात, शास्त्रींना लतिकेचं विलोभनीय दर्शन जितकं सोज्वळ तितकंच अवखळ, जितकं लाघवी तितकंच अभिमानी, जितकं प्रेमळ तितकंच बेफिकीर- नित्य घडत होतं. शास्त्री आणि गडकरी ह्यांच्यात, हा असा विलक्षण दुवा, ह्या लतिकेनं निर्माण केला होता.

'एकच प्याला' हे नाटक गडकर्‍यांनी गंधर्वाला दिलं ह्याचं कोल्हटकरांना साहजिकच थोडं वैषम्य वाटलं. ते गडकर्‍यांना भेटले. ह्याही नाटकाचे अधिकार त्यांनी कंपनीकरता मिळविले. दोन्ही कंपन्या 'एकच प्याला' करीत. गंधर्वांचे धाकटे बंधू बलवंत कंपनीच्या नाटकाला येत. मुक्त मनाने प्रशंसा करीत.
(संपादित)

शंकर बाळाजी शास्त्री यांच्या पत्‍नी प्रा. तारा शास्त्री यांनी लिहिलेल्या 'स्मृतिरंजन' लेखातून.
तरुण भारत, नागपूर; दीपावली विशेषांक १९७२.
सौजन्य- दै. तरुण भारत, सिद्धार्थ शंकर शास्त्री.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.