A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विंचू चावला

सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार

अग, ग.. विंचू चावला
देवा रे देवा.. विंचू चावला
आता काय मी करू.. विंचू चावला

अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी?

काम, क्रोध विंचू चावला
तम घाम अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला

मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं
सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची

या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा

तमोगुण म्हणजे काय?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.

सत्त्वगुण लावा अंगारा, अन्‌ विंचू इंगळी उतरे झरझरा

सत्य उतारा येऊन
अवघा सारिला तमोगुण
किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने
इंगळी - मोठा काळा विंचू.
विंचू चावला । वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्यानें माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारूण । मज नांगा मारिला तिनं ।
सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्त्व उतारा देऊन । अवघा सरिला तमोगुण ।
किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनें ॥४॥

(वृश्चिक - विंचू)

भावार्थ-

एकनाथ महाराजांचे हे फार प्रसिद्ध भारूड आहे. शाहीर साबळेंनी त्यात नाट्यमयता आणून, गाऊन ते आणखी लोकप्रिय केले. त्यात हरदासी कोटीही घुसडली. मुळात जीवात्मा हे भारूड म्हणतो.

परब्रह्म आणि त्रिगुणक्षोभिणी माया यांच्यातून अफाट विश्वाची निर्मिती झाली. त्यात माणूस हा एक प्राणी आहे. पण त्याचे विकार हे महाभयंकर आहेत. पाचमहाभूते, तीनगुण यांच्यासह आत्मा जिवाच्या सहाय्याने शरीरात वस्तीला येतो. इथे जीव आपला प्राण चालला आहे असे सांगतो आहे. कारण या मनुष्य देहाचे पंचप्राण व्याकुळ झाले आहेत. ते का? तर काम आणि क्रोध हा विंचू चावल्यामुळे. त्यामुळे तम-घाम आला आहे आणि मनोबुद्धी विचाराने युक्त अशा सूक्ष्मदेहाचा दाह होत आहे. मग जिवाची तगमग होणारच.

दुसर्‍या ओवीत म्हटले आहे- या इंगळीने नांगी मारली. त्यामुळे वेदना भयंकर होते. इंगळीची वेदना कल्पनेनेच जाणून घेतलेली बरी ! पण याला उतारा काय? तो आता तिसरीत सांगतात.

तमोगुण बाजूला सारायचा म्हणजे हांव कमी करायची. टीव्हीवर बघितलेली प्रत्येक वस्तू बाजारातून आणलीच पाहिजे म्हटले तर आयुष्य कमी पडेल. झोप कमी करायची. 'निद्रा भिकेची सोयरी' असे रामदास म्हणतात. दुसर्‍यांची निंदा टाळली पाहिजे. परस्‍त्रीची इच्छा धरू नये. परधन शिवू नये. कसल्याही लोभाचा व मोहाचा बळी स्वत:ला होऊ देऊ नये. थोडक्यात म्हणजे उत्‍कट, भव्य ते घ्यावे. 'मुखी राम त्या काम बाधू शकेना', म्हणून ईश्वराच्या अनुसंधनात कायम रहायचे. असे एकुणच देवाजवळ मनाने रहायचे. सत्त्वगुणांचा अंगारा म्हणजे काय? राख फासयची? मुळीच नाही. संसार नेटका करतकरत तो फिक्कट करायचा. म्हणजे कामे तर करायची पण त्यापसून जे काय मिळेल त्यात मन घालायचे नाही. आस लावून बसायचे नाही. वासना जाळून शुद्ध केली की सत्त्वगुणाचा अंगारा मिळतो. तो आपोआप लागतो. मग झरझर इंगळीचे विष उतरते. देह अभिमान, देहबुद्धी जाऊ लागते.

'अहं'चा भ्रम - वारा चढलेला असतो. त्याची किंचितशी राहिलेली बाधा सद्गुरू उतरवितो. साध्याच विषयातून परमेश्वराकडे, सद्गुरूकडे नेण्याचे सामर्थ्य असलेल्या या भारुडांच्या कर्त्याला, नाथ महाराजांना आठवले की तो दिवस शुद्ध होऊन जातो.

व्यंकटेश कामतकर
सार्थ भारूडे
सौजन्य- धार्मिक प्रकाशन संस्था, मुंबई