A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या धनागमकामी

या धनागमकामी वर-पितयां ।
सहज लाभे श्वानता मनुजीं वसतां ॥

सतत बघती धना ।
न सुतसुखलाभ मना ।
वाटते मितभाषिता नराधम मानितां ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- अनंत दामले
नाटक - हाच मुलाचा बाप
राग - सुवासुगराई
ताल-त्रिवट
चाल-दीं तना तेरेदानी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
धनागम - (धन + आगम) धनाचे आगमन.
श्वान - कुत्रा.
सुत - पुत्र.
एकोणीसशें सोळा सालच्या आगष्ट महिन्यांत कोल्हापूर मुकामीं कै. नानवा गोखले यांच्या 'लोकमान्य नाटक मंडळी'नें या नाटकाचा पहिला प्रयोग केला. गद्य रंगभूमीवर हें नाटक लोकप्रिय झाल्यानंतर ललितकलादर्श मंडळीचे तत्कालीन मालक केशवराव भोंसले यांच्या स-हृदय आग्रहावरून या नाटकाला संगीताची जोड देण्यांत आली. तो संगीत प्रयोग ता. ७ सप्टेंबर १९१८ रोजी नागपूर मुकामीं पहिल्यानें करण्यांत आला.

प्रस्तुत नाटकाचा विषय जरी जुना झाला आहे, तरी तो ज्या ठिकाणीं होता त्याच ठिकाणीं अजूनही आहे. उघडपणें हुंडा घेण्याची प्रवृत्ती या नाटकाच्या आरंभकालीं होती- अजूनही ती तशीच सुरू आहे- पण तिचे प्रकार मात्र प्रच्छन्‍न झाले आहेत; त्यामुळें या विषयाचे आकर्षकत्व नाटक या नात्यानें पूर्वीच्या इतकेंच आजही कायम आहे.

या नाटकाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी १९१७ मध्यें, दुसरी एप्रील १९१९ मध्यें व तिसरी आक्टोबर १९२१ मध्यें निघाली. ही तिसरी आवृत्ती चित्रशाळा प्रेसच्या द्वारें प्रसिद्ध झाली होती. चवथी आवृत्ती निघावयास दहा वर्षें लागण्याचा अजब चमत्कार कोणत्या कारणामुळें घडून आला आहे, हें सांगणे कठीण आहे. नागपूरच्या युनिव्हर्सिटीने अभ्यासक्रमांत या पुस्तकाचा समावेश केला नसता तर ही चवथी आवृत्ती निघावयास किती वर्षे लागली असती, हेंही सांगणे तितकेच कठीण आहे.

पहिल्या गद्य आवृत्तीपेक्षां शुद्धाशुद्धा पलिकडे या आवृत्तींत कोणताच फरक केला नाहीं. नुसतीं पद्यें गाळली म्हणजे बरहुकूम पहिली गद्य आवृत्ती होऊं शकते.
(संपादित)

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
दि. १ सप्टेंबर १९३१
'हाच मुलाचा बाप' या नाटकाच्या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे पुराणिक आणि मंडळी, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.