A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
याजसाठीं केला होता अट्टहास

याजसाठीं केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

आतां निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥

कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचें तेणें गुणें ॥३॥

तुका ह्मणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४॥
खुंटणे - थांबणे / कुंठित होणे.
धांवा - मदतीला धांवून येण्यासाठी (परमेश्वराची) केलेली विनवणी, प्रार्थना / फेर्‍या.
परिणीत - विवाहित.
वेचणे - खर्च करणे.
भावार्थ-

  • यासाठीच मी सगळी खटपट केली. माझे शेवटचे दिवस सुखाने जावेत.
  • कोणत्याही तृष्णा (तहान, अभिलाषा) राहिल्या नाहीत. मला शांतपणे विश्रांती घेता येईल याची खात्री आहे.
  • श्रीहरीच्या चिंतनात आयुष्य खर्च झाल्यामुळे कौतुक वाटते. त्या मंगल नाम स्मरणाचा हा गुण आहे.
  • तुकाराम महाराज म्हणतात, मी 'मुक्ती' या नवरीचा स्वीकार करून तिच्याशी लग्‍न केले. आता तिच्याशी खेळीमेळीने वागून चार दिवस मजेत दवडणार आहे.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.