यमुनाकाठी ताजमहाल
मूर्तिमंत झोपली प्रीत अन् मृत्यूचे ओढून पांघरूण
जीवन कसले महाकाव्य ते गाईल जग चिरकाल
यमुनाकाठी ताजमहाल
नि:शब्द शांती अवतीभवती, हिरे जडविले थडग्यावरती
एकच पणती पावित्र्याची जळते येथ खुशाल
यमुनाकाठी ताजमहाल
हळूच या रसिकांनो येथे, नका वाजवू पाऊलांते
दिव्यदृष्टिला होईल तुमच्या मंगल साक्षात्कार
यमुनाकाठी ताजमहाल
गीत | - | अनिल भारती |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
बादशहाच्या अमर प्रीतिचे मंदिर एक विशाल
यमुनाकाठी ताजमहाल
त्याचे कवी अनिल भारती. या कवीची बरीच गाणी मी त्यावेळी गायलेलो आहे. हे गीत त्यांनी मला अतिशय प्रेमाने दिलेलं. मी त्याला चाल लावून चार-पाच वर्षे प्रत्येक कार्यक्रमातून गात होतो. मुंबईपासून, नाशिक, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर अशा सगळ्या ठिकाणी मी कार्यक्रमात हे गीत गात असे. खूप लोकप्रिय झालं होतं. परंतु नंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भावगीत गायक, श्री. गजाननराव वाटवे यांनी पण हेच गाणं बसवलं, कार्यक्रमात म्हणू लागले व अखेर एच.एम.व्ही.ने त्यांच्याच आवाजात या गाण्याची ध्वनिमुद्रिका काढली. अन् मग एकच गाणं निराळ्या चालीत व निराळ्या गायकांच्या आवाजात श्रोत्यांना ऐकायला मिळू लागलं.
यात वाईट काहीच नाही. त्यात सरस-नीरस ठरवण्याचाही प्रश्न नाही. कारण लोकांना दोन्ही प्रकार आवडत असे. मला असं म्हणायचंय की एकच कलाकृती दोन कलाकार आपल्या परीने व प्रज्ञेने अभिव्यक्त करत असले तर त्यात रसिकांना नाविन्य अनुभवायला मिळते. ज्यांना जे आवडेल ते निवडण्याचा त्यांचा हक्क आहेच.
श्री. गजानन वाटवे यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. ते तर भावगीत गायनाचे जनक आहेत. भावगीतांचे युगप्रवर्तक आहेत. त्यांच्या आवाजात तुम्हाला हे गीत ऐकायला मिळते ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी हे गाणं चागलंच गायलेलं आहे. माझ्याबाबतीत मी एवढेच म्हणेन की हे गाणं माझ्या चालीत व आवाजात रेकॉर्डवर गायचा योग नव्हता.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली