A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ये जवळी घे जवळी

ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता

रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेहि न गवताचे
शोभवि मम माथा

निशिदिनि या नटुनि-थटुनि
बघ नौका जाति दुरूनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता

चमचमती लखलखती
तव मंदिरि दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा
गीत - वि. स. खांडेकर
संगीत - मीना खडीकर
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - माणसाला पंख असतात
राग - यमन
गीत प्रकार - चित्रगीत
निशिदिनी - अहोरात्र.
​'सुरेल चित्र' तर्फे निर्मिती झालेला 'माणसाला पंख असतात' हा चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथा-संवाद आणि तीन गाणी खांडेकरांनी लिहिली होती.

महाराष्ट्र आणि भारत सरकारनं गौरव केलेल्या 'माणसाला पंख असतात' ची कथा अस्पृश्योद्धारावरील आहे, त्याचे कथासूत्र पुढीलप्रमाणे-
'कमल' या टोपणनावानं अरविंद कविता लिहीत असतो. तो आजारी पडून हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. तिथं मंजिरी त्याची मनापासून शुश्रुषा करते. ती 'कमल' च्या कवितांची चहाती असते. कमल आपली मैत्रिण आहे, असं अरविंद तिला सांगतो. त्यांचं प्रेम जमतं. आपली सून म्हणून मुकुंदबुवा तिला स्वीकारतात; पण ती हरिजन आहे हे नंतर कळल्यावर ते तिचा अव्हेर करतात. ती हरिजन वस्तीत राहून समाजकल्याणाचं कार्य करू लागते; पण त्यांचे एकमेकांवर खरं प्रेम असतं. तो जनरूढीपेक्षा तिला अधिक प्रिय मानतो. अरविंद-मंजिरी लग्‍न करतात आणि उद्भवलेल्या परिस्थितीला न डगमगता धैर्यानं तोंड देतात. 'माणसाला पंख असतात' चे संगीत मीना मंगेशकर (सौ. खडीकर) ह्यांनी दिलं होतं.

लता आणि हृदयनाथ मंगेशकरांचं पार्श्वगायन हे या बोलपटाचं एक वैशिष्ट्य होतं. आशा भोसलेंच्या आवाजात एक गीत 'ये जवळी ये' घ्यायचं होतं, पण आयत्यावेळी ते लतांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं. 'ये जवळी ये' चा उल्लेख लतादिदींनी आपल्या 'आवडती गाणी' मध्ये पुढीलप्रमाणे केला आहे.

'ये जवळी ये, प्रिय सखया भगवंता ! माझे अत्यंत आवडीचे गाणे आहे. श्रेष्ठ साहित्यिक भाऊसाहेब खांडेकर यांनी ते लिहिले आहे. 'सुरेल चित्र'च्या 'माणसाला पंख असतात' या चित्रपटासाठी माझी कनिष्ठ बहिण मीना हिने त्यावर स्वरसाज चढविला आहे. हे गाणे मला आवडले ते माझ्या बहिणीने त्याला संगीत दिले म्हणून नव्हे. त्याची कारणे वेगळीच आहेत. या गीतातील एकंदर कल्पनाच मनोरम आहे. अस्पृश्योद्धारावरील हा चित्रपट आहे. या गाण्यात समुद्र आणि त्याच्या शेजारचा खडक यांना मध्यवर्ती स्थान देऊन, त्यांच्या रूपाने आपल्या समाजातील स्पृश्य-अस्पृश्यवादावर विदारक प्रकाश टाकला आहे. भाऊसाहेबांनी नि त्याचे चित्रणही माधवराव शिंद्यांनी उत्तम केले आहे. अगदी मालवणच्या खडकाळ समुद्रावर. अर्थात मीनाने त्याला चालही तितकीच सुरेख दिली आहे. आमचे बाबा नेहमी एक पद गुणगुणत असत. मीनाच्या कानात ती चाल चांगलीच बसली होती. या गीताच्यावेळी तिने त्या चालीचा उपयोगही कल्पकतेने केला आहे. तिने व आशाने तालमीही चांगल्या केल्या होत्या. कारण, आशाच ते गीत गाणार होती. काहीवेळा मी त्यांच्या तालमींना असे. म्हणून माझ्या ते कानांवरून गेले होते इतकेच; आणि त्यावेळी मला ते फार आवडले होते. पण गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या तिचा धाकटा मुलगा नंदू एकदम आजारी पडला नि आशाला ते गाणे गाणे शक्य नव्हते. माधवरावांना तर ते त्वरित हवे होते. कारण त्यांच्या चित्रपटाची नायिका मालवणात जाऊन बसली होती, गीताची वाट पाहात ! त्यावेळी ते मी गायले आणि ते गीत चांगले झाले नि माझ्या आवडीच्या गीतांत स्थान पटकावून बसलेले.(स्वरलता- वसंत भालेकर)

'माणसाला पंख असतात' मध्ये पुन्हा एकदा खांडेकरांच्या मनातील सामाजिक प्रश्नांबद्दलची प्रामाणिक कळकळ दिसून येते. 'उभवु उंच' सारख्या गीतात निशाण उंच उभवताना त्यांच्या पूर्वसूरींच्या केशवसुती शूर शिपायाचे स्मरण होते. शेवटी गांधीजींच्या हरिजनप्रेमाचा संदर्भ या हरिजनोद्धारविषयक चित्रपटात येणे स्वाभाविक होते.
(संपादित)

गंगाधर महाम्बरे
वि. स. खांडेकरांची चित्रगीते
सौजन्य- दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.