A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
येतो रे येतो सजणा

येतो रे येतो सजणा,
सवतीचा गंध तुझ्या वसना !

मणिबंधावर कुणी बांधिला?
सैल किती हा गजरा पडला
सराईत तो हात दिसेना

ओळखीचा हा नव्हेच दरवळ
विचार पवना तोही सांगिल
नवथर हा, तुज छळित ही ना

नेत्र असे कां मला टाळती?
कां भिवयांवर असे खेळती?
भाव चोरटे, छपवित गुन्हा
नवथर - नवीन.
मणिबंध - मनगट.
वसन - वस्‍त्र.
आम्ही कवींनी केलेल्या कवितांपासून जरासे लांब असू.
पण नाटकामध्ये नाटककारांनी केलेल्या कवीतेशी आमचा खूप जवळचा संबंध आहे. आमच्याकडे राम गणेश गडकरींसारखे काव्यप्रभू होते. देवल आहेत, किर्लोस्कर आहेत, खाडीलकर आहेत. बाळ कोल्हटकरांसारखा कवी, लेखक मराठी रंगभूमीवर आलेला आहे. कवीवर्य रा. ना. पवार, चिं. त्र्यं. खानोलकर, गंगाधर महांबरे हे सारे तर आमच्याकडे राहिलेले आहेत. त्यामुळे शब्दांची साधना हे लोकं किती करतात, हे आम्ही ते अगदी जवळून अनुभवलेले आहे.

खानोलकरांचे अनुभव तर फारच ग्रेट. निळकंठबुवा अभ्यंकर आणि खानोलकर यांच्या चर्चा व्हायच्या, त्यातला क्षणन्‌ क्षण कानात साठवून ठेवला आहे. आमचे बुवा शब्द 'गेय' हवा यावर ठाम असत. खानोलकर एकही शब्द इकडचा तिकडे करायला तयार नसत.
येतो रे येतो सजणा
सवतीचा वास तुझ्या वसना
ही त्यांची शब्दरचना होती.
बुवा म्हणाले, "'वास' म्हटल्यावर हे जरा विचित्र वाटते. हा शब्द बदला ना कवीराज." खानोलकर म्हणाले, "गंध चालेल?" चालेल- म्हंटल्यावर ते पद झाले.
येतो रे येतो सजणा
सवतीचा गंध तुझ्या वसना
असे पद कायम झाले.
नांदीच्या पदातला 'कळा' हा शब्द बदलायला मात्र खानोलकरांनी ठाम नकार दिला. त्यांच्या मते, 'कला' सादर होत असताना नटाला असंख्य 'कळा' अनुभवाव्या लागतात. तेव्हा तुमची 'कला' पोहोचते. अशा चर्चेतून आमचे जीवन समृध्द होऊन गेले.

अभोगी नाटकाने यश जरी दिले नसेल पण आमचे जीवन अगदी संपन्‍न केलेले आहे. संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होते आणि त्यातून कलाकृती बाहेर येते, हे फार महत्त्वाचे आहे.
(संपादित)

कीर्ती शिलेदार
सौजन्य- culturalpoona.blogspot.com (सुभाष इनामदार, पुणे)
(Referenced page was accessed on 17 Feb 2020)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.