A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
योगियां दुर्लभ तो म्यां

योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥

देखिला देखिला गे माये देवाचा देवो ।
फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥

अनंतरूपें अनंतवेषें देखिला म्यां त्यासि ।
बाप रखुमादेविवरू खूण बाणली कैसी ॥३॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत -
स्वर- छोटा गंधर्व
राग - तिलककामोद
गीत प्रकार - संतवाणी
धणी - विपुलता.
बाणली - ठसणे / बिंबणे.
भावार्थ-

परमेश्वरदर्शनाचा ओसंडून वाहणारा आनंद ज्ञानेश्वरांनी किती सहजगत्या काव्यात्‍म केला आहे पहा.

सखी साजणीशी संवाद होतो आहे कारण भेटीचे गुज सांगायचे ते कोणाला? सखीलाच. अधिक जवळिकेसाठी तिला 'माये' असेसुद्धा म्हटले आहे. हा परमेश्वर कसा, तर योग्यांनासुद्धा दुर्लभ असतो आणि आपल्या भक्तासाठी अनंत रूपे आणि अनंत वेष घेतो. त्याला पाहतापाहता मन भरून गेले तरीही मनाची काही तृप्ती होत नव्हती. देवांचा हा देव पाहिला आणि सगळे संदेह संपले. एवढेच नाही, तर द्वैतभावही गळून पडला आणि आपणच परमेश्वर झाल्याची खूणही सापडली.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे