A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झर झर धार झरे

झर झर झर झर धार झरे

धार सुधेची कामधेनूची
भर भर भर भर कलश भरे.

नंदनवनसम गमते गोकुळ
शांतिसौख्यमय जीवन मंगल
वैभव धन हे अमोल येथिल
धेनु, गोजिरी वासरे.

हरीची मुरली वाजे मंजुळ
प्रमुदित करिते गोकुळ सारे.
गीत - शांताराम आठवले
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- शांता आपटे
चित्रपट - गोपालकृष्ण
ताल-केरवा
गीत प्रकार - चित्रगीत
कामधेनु - इच्छित वस्तू देणारी गाय.
धेनु - गाय.
प्रमोद - आनंद.
सुधा - अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा.
'गोपाळकृष्णा'च्या भूमिकेत

मुंबईच्या सागर मुव्हिटोनमध्ये वयाच्या नवव्या वर्षापासून बालकलाकार म्हणून मी कामे करू लागलो. दिग्‍दर्शक होते पुढे ख्यातनाम झालेले मेहबूब खान. त्यांच्या 'वतन', 'जागीरदार', 'डेक्कन क्वीन', 'मनमोहन' आदी चित्रपटांतून मी भूमिका केल्या. मेहबूब खान मला प्रेमाने मनू 'म्हणत' असत. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्या प्रत्येक बोलपटाचा मुहूर्त त्यांच्या या लाडक्‍या मनूवर होत असे. त्यामुळे आपला चित्रपट यशस्वी होतो, अशी त्यांची श्रद्धा होती. पण 'प्रभात'सारख्या प्रतिष्ठित, प्रख्यात चित्रसंस्थेत मुलांना कामे मिळावीत अशी माझ्या वडिलांची, अण्णांची फार इच्छा होती. मुलांवर चांगले संस्कार होतील, त्यांना योग्‍य वळण लागेल असे त्यांना वाटत होते.

तो योग अचानक आला. संत तुकारामाच्या भूमिकेने अजरामर झालेले विष्णुपंत पागनीस अण्णांच्या परिचयाचे होते. त्यांनी सांगितले 'प्रभात', 'गोपालकृष्ण' हा चित्रपट सुरू करणार आहे. त्यांना कृष्णाच्या भूमिकेसाठी चुणचुणीत, गाणारा मुलगा हवा आहे. तुम्ही राम व अनंत दोघांनाही पुण्याला पाठवून द्या. हे ऐकून अण्णांना अत्यानंद झाला. शिवाय जगभर कीर्ती संपादन करणार्‍या 'संत तुकाराम'चे दिग्‍दर्शक दामले-फत्तेलाल 'गोपालकृष्ण'चे दिग्‍दर्शन करणार होते. आम्हा मुलांना 'संत तुकाराम' अण्णांनी आठ-दहा वेळा दाखवला होता. माझे पाठचे भाऊ माधव आणि अनंत हेही बालकलाकार म्हणून चित्रपटात कामे करू लागले होते.

'प्रभात' स्टुडिओत केशवराव भोळे यांनी आमच्या गाण्याची चाचणी घेतली. 'प्रभात'च्या 'अमरज्योती' चित्रपटातील मा. कॄष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांपैकी 'आज हमे बन बेहद भाता' हे द्वंद्वगीत म्हणून दाखविले. दोघांनाही कृष्णाची रंगभूषा करून बघण्यात आली. मी तेव्हा तेरा वर्षांचा होतो. माझे वयही योग्‍य होते, शिवाय 'गोपालकृष्ण'ला संगीत मा. कृष्णरावांचे होते. बालपणापासूनच मला मा. कृष्णरावांच्या गायकीचे वेड. त्यांची गाणी मी त्यांच्याचसारखी सहीसही म्हणण्याचा प्रयत्‍न करीत असे. या सगळ्यामुळे कृष्णाच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. आपली गायकी गाणारा मुलगा मिळाला म्हणून मा. कृष्णरावांना खूप बरे वाटले. राधेचे काम शांता आपटे करणार होत्या.

मास्तरांनी दिलेल्या सर्वच चाली गोड होत्या. ऐकल्याबरोबर मोह पडाव्या अशा. पुष्कळदा चाल सोपी वाटली तरी तशी असेच असे नाही. त्यात मास्तरांच्या काही खास जागा असत. त्या अर्थातच अवघड असत. पण मास्तर माझे आदर्श असल्याने मला फारसे जड गेले नाही. उलट मी एखादी मुरकी, हरकत स्वत:ची ठोकून देत असे, तेव्हा मास्तरांना कौतुक वाटे. 'गोपालकृष्ण' हा संगीतप्रधान चित्रपट होता. एकूण चौदा गाणी होती. त्यावेळी ती सर्व लोकप्रिय झाली होती. मास्तरांच्या विविध विलासाला भरपूर वाव होता. मी गायलेली 'गौळणी गे, साजणी गे', 'गुणशीला, तू अतुला', 'तुझाच छकुला तुझाच गे मम माउली' ही गाणी जुन्या पिढीच्या आजही स्मरणात आहेत.

या चित्रपटासाठी डोंबिवलीच्या गोग्रासवाडीहून पंचवीस-तीस गायी आणण्यात आल्या होत्या. सकस खुराक खाऊन त्या धुष्टपुष्ट, तेज:पुंज व सर्वांच्या सवयीच्या झाल्या होत्या. एक्‍स्ट्रॉ नट्यांना गोपींचा वेष घालून त्यांची धार काढण्याचा सराव करावा लागे. त्यामुळे 'तू माउली जगाची' या गीतात गोपी धारा काढतात हे दृश्य अगदी वास्तव दिसले. शांताबाईही धार काढायला शिकल्या, कारण-
झर झर झर झर धार झरे
धार सुधेची कामधेनूची
भर भर भर भर कलश भरे

- हे गाणे त्यांना धार काढताकाढता म्हणायचे होते. त्यातली एक देखणी गाय माझ्या 'गुणशीला, तू अतुला, जननी तू जगताची' या गाण्याला माझ्या जवळ उभी होती. जणू तिला ते कळतेय अशी ती उभी होती. या गायींची अशी ही लोभसवाणी दृष्यं हे 'गोपालकृष्ण'चे खास आकर्षण होते.

'गोपालकृष्ण'च्या तालमी सुरू झाल्या आणि एक दुर्घटना घडली. अण्णांचे फ्लूरसीने आकस्मिक निधन झाले. मला 'प्रभात' चित्रात अण्णा पाहू शकणार नाहीत या कल्पनेने माझ्या दु:खात आणखीनच भर पडली. मी सर्वात मोठा मुलगा. मुंज झालेला. सर्व धार्मिक विधी करावे लागले. त्यामुळे मला विग लावून काम करणे भाग पडले.

मला स्टुडिओत चालत यायला लागू नये म्हणून फत्तेलालनी मला सायकल घेऊन दिली होती. चालक माझे पालकही होते. करारात नसतानाही ग्रामोफोन रेकॉर्डस्‌ची रॉयल्टी मला मिळण्याची व्यवस्था दामलेमामांनी केली. 'गोपालकृष्ण' पुरा होत आला आणि आम्हा भावंडात सर्वात देखणा माधव अल्पायुषी ठरला. पुन्हा एकदा दुर्दैवाने आघात केला. 'गोपालकृष्ण' प्रदर्शित होऊन १८ मे रोजी पन्‍नास वर्षे झाली. प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले होते. तेव्हा मला अण्णांच्या व माधवच्या आठवणीने भरून आले. डोळे सारखे पाणावत होते.

'गोपालकृष्ण' संपवून मुंबईला परत जाताना फार वाईट वाटले होते, पण पुढच्याच 'माणूस' या चित्रपटातील रामू या हॉटेलबॉयच्या भूमिकेसाठी दोघा-तीघांची चाचणी घेऊन झाल्यावर मला पुन्हा बोलावणे आले. याही चित्रपटाला संगीत मा. कॄष्णरावांचेच होते. मला 'गुलझार नार नारी' हे गाणे आणि हातात कपबश्यांचा कुतुबमिनार घेऊन मैना नायकिणीकडे जाताना 'तारर नॉव नॉव' हे निर्रथक शब्दांची मोहक गुंफण असलेले एक गाणे, अशी दोन गाणी होती. गोपालकृष्ण', 'माणूस' हे दोन्ही गाजले. 'प्रभात'ला दिगंत कीर्ती मिळवून देणार्‍या व्ही. दामले, एस. फत्तेलाल आणि व्ही. शांताराम यांच्या दिग्‍दर्शनाखाली मला भूमिका करायला मिळाल्या हे समाधान मी कधीही विसरू शकत नाही. नंतर संगीत नाटकांतून मी भूमिका केल्या. ती नाटकेही यशस्वी ठरली.

या दोन चित्रपटांनंतर मी संगीतक्षेत्राकडे वळलो. मा. मनहर बर्वे, पं. मिराशीबुवा, पं. वामनराव सडोलीकर, पं जगन्‍नाथराव पुरोहित आदी गुरुजनांकडून क्षणश: नि कणश: गानविद्येचे अमृतकण मी वेचून घेतले. मा. कृष्णरावांनी तर त्यांच्या अखेरचा काळात मला प्रेमाने संगीत भरवले. त्यांचे ऋण कधीही फिटणार नाही.
(संपादित)

पं. राम मराठे
सदर- अजूनही आठवते
सौजन्य- दै. सकाळ (३ ऑगस्‍ट, १९८८)
सौजन्य- राजाभाऊ फुलंब्रीकर, प्रिया फुलंब्रीकर

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख