A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आधी बीज एकलें

आधी बीज एकलें
बीज अंकुरलें रोप वाढलें

एका बीजापोटीं, तरू कोटी
कोटी जन्म घेती सुमनें-फलें

व्यापुनि जगता तूंहि अनंता
बहुविध रूपें घेसी, घेसी
परि अंती ब्रह्म एकलें
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर- विष्णुपंत पागनीस
चित्रपट - संत तुकाराम
गीत प्रकार - भक्तीगीत, चित्रगीत
  
टीप -
• 'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं' या संत तुकारामांच्या रचनेने स्फूर्ती घेऊन शांताराम आठवले यांनी हे गीत लिहिले.
सुमन - फूल.
१९३६ सालापासून केशवराव भोळे 'प्रभात' या प्रसिद्ध चित्रपट कंपनीचे संगीतदिग्‍दर्शक होते. संत तुकाराम, कुंकू, संत ज्ञानेश्वर, रामशास्‍त्री या मराठी चित्रपटातील गाणी एकापेक्षा एक अशी उत्‍कृष्ट होती. त्यांच्या संगीत रचनेचे कौशल्य म्हणजे कल्पनाशक्तीचा विलास होता. ज्या काळात त्यांनी या चित्रपटाची गाणी केली त्या काळात रेकॉर्डिंगचं तंत्र एवढं प्रगत झालेलं नव्हतं. तरीसुद्धा आज देखील ती गाणी ऐकताना आपण रंगून जातो. विष्णूपंत पागनीस यांनी तुकारामाच्या भूमिकेत गायलेला अभंग 'आधी बीज एकले' किंवा 'सदा माझे डोळे' म्हणजे केशवराव भोळे यांनी स्वरबद्ध केलेल्या भक्तिरसाचा साक्षात अनुभव म्हणावा लागेल. 'आधी बीज एकले' या गाण्याचं चित्रीकरण एवढं प्रभावी झालं होतं आणि गाण्याची चालही इतकी प्रासादिक होती की, ते गाणं ज्याच्या त्याच्या तोंडी होतं. असं म्हणतात की, तुकारामाच्या गाथेचे अभ्यासक या अभंगामुळे चक्रावून गेले होते. अभंगाचा ढंग असा होता की, तो अभंग संत तुकारामांचा वाटावा. पण गाथेत खूप शोध घेऊनही त्यांना हा अभंग सापडेना. शेवटी कळलं की हा अभंग तुकारामाचा नसून चित्रपटासाठी कवी शांताराम आठवले यांनी रचलेला आहे. इतकी सुंदर रचना होती ती.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन.
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख