शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं ॥१॥
शब्दचि आमुच्या जिवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका ह्मणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करूं ॥३॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
गीत प्रकार | - | संतवाणी |
या अभंगातून तुकाराम महाराजांनी शब्दाचं सामर्थ्य, शब्दाचा आवाका, शब्दाची व्याप्ती वर्णन केली आहे. आमच्या घरी शब्दरूपी रत्ने हीच संपत्ती, धन आहे. आणि वेळ आली तर आम्ही प्रयत्नाने शब्दांचीच शस्त्रे करू. शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन म्हणजे आमचा प्राण आहे. आम्ही लोकांना शब्दधन वाटू. शब्द हाच देव आहे, त्या देवाची आम्ही शब्दानेच पूजा करू, असे तुकाराम महाराज सांगतात.
माणसानेच देवाला देव म्हटले आणि देव देव झाला. सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला. तलवार समोरच्याला संपवू शकते पण शब्द पुढच्या कित्येक पिढ्याही गारद करतात हे शब्दाचं सामर्थ्य आहे. ज्यांना हजारो वर्षे ज्ञानाचा अधिकार नाकारण्यात आला त्या शूद्रवंशी जन्म घेऊनही तुकाराम महाराजांनी शब्दाचं हे सामर्थ्य जाणलं. हिच त्यांच्या श्रेष्ठ प्रतिभेची साक्ष आहे. हजारो वर्षांच्या ज्ञानबंदीमुळे हजारो वर्षांपासून करोडो स्त्रीया आणि शूद्रातिशूद्रांच्या प्रतिभेची, कर्तृत्वाची भ्रूणहत्या होत राहिली, ते अज्ञानाच्या काळोखात पिचत राहिले. ज्यांना हे शब्दसामर्थ्य उमगलं आणि ज्यांनी त्याची आराधना केली त्यांनी इतिहासावर आपला ठसा उमटवला. कोणत्याही धनापेक्षा शब्दधन श्रेष्ठ आहे, कोणत्याही शस्त्रापेक्षा शब्द हे अधिक प्रभावी शस्त्र आहे. शब्द हाच परमेश्वर आहे, शब्दानेच त्याची पूजा केली जाते आणि म्हणून शब्द हाच प्राण आहे, असं तुकाराम महाराज सांगतात.
(संपादित)
उल्हास पाटील
सौजन्य- गाथा परिवार (ब्लॉगस्पॉट)
(Referenced page was accessed on 04 Nov 2021)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.