योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥
देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।
तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥
अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥
चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।
निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥
ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।
विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
राग | - | यमन |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
अनंगपणा | - | सकामता, देहबुद्धी. |
अश्वत्थ | - | पिंपळ. |
जेवी | - | जसा, ज्याप्रमाणे. |
निरंजन | - | निर्गुण ब्रह्म. |
अधिक पाहावयाचे म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर एकान्तात लीन झाले पाहिजे. पण तत्पूर्वी देहधर्म सगळे त्यागले पाहिजे. मोहवासना सगळ्यासगळ्या लोपल्या पाहिजेत. हे सगळे झाले तरच आत्मस्वरूप लक्षात येते आणि समाधान मिळते. योगिराजाचे ध्यान हेही महत्त्वाचे आहेच. ज्ञानेश्वर म्हणतात, ही सगळी अवस्था आपल्याला प्राप्त झाली आणि आता प्रपंचही पुरेसा झाला. आता आत्मस्वरूपाच्या आनंदात निमग्न राहावयाचे आहे. ही अवस्था म्हणजे विठ्ठलाचे दर्शन.
चंदनाच्या सुगंधाने अश्वत्थही फुलून उठतो तशीच आपलीही अवस्था झाली आहे.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.