A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऐक ऐक सखये बाई

ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगूं काई ।
त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई ॥१॥

देवकीनें वाईला यशोदेनें पाळिला ।
पांडवांचा बंदीजन होऊनियां राहिला ॥२॥

ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचें निजधन ।
चोरी केली म्हणऊन उखळासी बंधन ॥३॥

सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूळपाणि ।
राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥

शरण एका जनार्दनीं त्रैलोक्याचा मोक्षदानीं ।
गाई गोपी गोपबाळां मेळवीले आपुलेपणीं ॥४॥
उखळ - कांडण्या−सडण्यासाठी दगड खोदून किंवा लाकडाचा ओंडका पोखरून केलेला खोलगट भाग.
वाईणे - वाहणे, अर्पण करणे.
शूळपाणि - शंकर, महादेव.
पृथक्‌

शरण एका जनार्दनीं त्रैलोक्याचा मोक्षदानीं ।
मूळ अभंगात
शरण एका जनार्दनीं कैवल्याचा मोक्षदानीं ।
असे आहे.

संदर्भ- ब्रह्मीभूत श्रीनानामहाराज साखरे कृत 'श्री एकनाथ महाराज यांच्या अभंगांची गाथा', आवृत्ती चवथी.
सौजन्य- इंदिरा प्रकाशन, पुणे.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.