रोखुनि मज पाहुं नका !
जादुगिरी त्यांत पुरी
येथ उभे राहुं नका.
घालुं कशी कशिदा मी?
होती किति सांगुं चुका !
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका.
खळबळ किति होय मनीं !
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावुं नका !
गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले ∙ जी. एन्. जोशी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
राग | - | मिश्र मारुबिहाग |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
टीप - • काव्य रचना- १८९१ साल. | ||
• स्वर- आशा भोसले, संगीत- वसंत प्रभू. • स्वर- जी. एन्. जोशी, संगीत- जी. एन्. जोशी. |
कशिदा | - | वस्त्रावर केलेले वेलबुट्टीचे नक्षीकाम. |
पण १९२८ सालापासून होणार्या माझ्या मैफलीत मी हे काव्यगायन सुरू केले. प्रथम 'किती गोड गोड वदला', 'तूं माझी अन् तुझा मीच' ही काणेकरांची दोन भावगीतं मी गाऊ लागलो. त्यापैकी पहिल्या कवितेचे ध्वनीमुद्रण मी मास्टर्स व्हॉईस कंपनीत करविले होते. ते 'गुलाबाचे गाणे' म्हणून मुंबईत व उपनगरांत फारच प्रसिद्ध झाले. ही मी केलेली पहिली चाल ! आता मला ती सर्वस्वी अनुरूप वाटत नाही; अंशत: अनुरूप आहे. विशेषत: 'काटा हळूच हाले' ही ओळ जमावी तशी जमली नाही. स्वर भावपोषक झाले नाहीत. म्हणताना खटकू लागले. तेव्हा म्हणण्यात हळुवारपणा आणून ती कळ उमटविण्याचा मी प्रयत्न करीत असे. पण स्वरच पोषक नव्हते तर तो हळुवारपणा फुकट जाईल नाही तर काय? त्यात एकाही श्रोत्याने या उणिवा दाखविल्या नाहीत. उलट सगळे योग्यच आहे अशा खुषीत ते भावगीत ऐकत. हा त्या भावगीताचाच परिणाम असावा. ही जाणिव झाल्यावर मी ते गाणे सोडले.
पण चाल योग्य असावी हा धडा मात्र या भावगीतापासून मी शिकलो. 'तूं माझी अन् तुझा मीच ही', 'डोळे हे जुलमी गडे' या दोन भावगीतांच्या चाली रचताना ओळ न् ओळ समर्पक होते आहे की नाही या खटपटीत मी राहिलो. माझ्या दृष्टीने चाली पूर्णपणे अनुरूप झाल्यावरच मी ती भावगीते म्हणू लागलो.
'डोळे हे जुलमी गडे' फारच लोकप्रिय झाले. माझ्या बंधूंनी - वासुदेवरावांनी - मी म्हणतो ती पद्धती कशी अर्थपूर्ण आहे, हे मला प्रत्येक ओळ म्हणून घेऊन समजावून दिले. म्हणजेच मी जे जाणिवेने केले होते, तेच त्यांना आवडल्याने त्यांनी सोदाहरण समर्पक पटवून दिले. माई जोशी, सौ. कुसुम फाटक, गोविंदराव जोशीही माझ्याकडून हे भावगीत शिकून गेले.
मी ते रेकॉर्ड केले तेव्हा माझी परीक्षा चालू होती. त्या गर्दीत माझ्या मनासारखे मला ते गाता आले नाही.. आणि रेकॉर्ड काही चांगले झाले नाही.
(संपादित)
केशवराव भोळे
माझे संगीत - रचना आणि दिग्दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई