A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गंगा जमुना डोळ्यांत उभ्या

गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का?
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे सारे गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती जा

दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले खोळंबुन गाडी
पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी
रूपदर्पणी मला ठेवुनी जा

मोठयांची तू सून पाटलिण मानाची
हसले तुझे ग हिरवे बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरू परि आईला जा
कढ - उकळी / आधण.
खिलारी - बैलाची एक जात.
घुंगुरवाळा - घुंगरे लावलेला लहान मुलाच्या पायांतला पैंजण.
बिलवर - उच्‍च प्रतीची काचेची बांगडी.
सुगम संगीतात काही प्रसिध्द आणि यशस्वी संगीतकार–गायक जोड्या होऊन गेल्या. हिंदीत नौशाद-महम्मद रफी, ओ. पी. नय्यर–आशा भोसले, राहुल देव बर्मन, कल्याणजी आनंदजी–किशोर कुमार, मदन मोहन–लता मंगेशकर आणि आपल्या मराठीतली एक अशीच जोडी आहे.. वसंत प्रभू–लता मंगेशकर !

एकमेकांच्या प्रतिभेविषयी, कर्तृत्वाविषयी, स्वभावाविषयी जेव्हा परस्परांना अचूक अंदाज येतो.. तेव्हा अशी प्रतिभावान माणसे एकत्र येतात.. नेहेमीचे शिष्टाचार, रितीरिवाज सोडून.. वेळी व्यावसायिकता विसरून एकमेकांना सहकार्य करीत काम करतात आणि प्रदीर्घ काळ एकत्रपणे काम करतात.. टिकतात. अन्यथा ज्या काळातली या जोडीची लोकप्रिय गाणी आहेत, त्या काळात लता मंगेशकर हिंदी चित्रपटसृष्टीत एवढ्या व्यस्त होत्या की वसंत प्रभू सोडून क्वचितच इतका वेळ त्यांनी दुसर्‍या कुठल्या संगीतकाराला दिला असेल. या अशा प्रतिभावान कलाकारांमुळे अनेक अजरामर कलाकृती जन्म घेतात आणि आपल्यासारख्या रसिकांना त्यांच्या कलेचा पुरेपूर आनंद मिळतो.

वसंत प्रभू–लता मंगेशकर यांच्या, 'गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का' या गाण्याची गोष्ट आपण आज ऐकणार आहोत, ज्याचे गीतकार आहेत पी. सावळाराम.. ज्यांच्या शब्दांनाही संगीतकार आणि गायकाएवढंच महत्त्व आहे. या जोडीची समस्त गाणी संख्येनी एवढी आहेत आणि त्यांचा दर्जा एवढा महान आहे की त्यावर एक ग्रंथच लिहायला लागेल. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' 'मधु मागसी माझ्या सख्या' 'चाफा बोलेना' अशी काहीच उदाहरणे पुरेशी आहेत.

वलयांकित व्यक्ती आणि त्यादेखील चित्रपटसृष्टीतले तारे-तारका असतील तर त्यांच्या अगदी साध्या गोष्टीलाही वारेमाप प्रसिद्धी मिळते. अहो, लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम अशा असामान्य व्यक्ती म्हणजे काय झालं ! गोष्ट अगदी साधी होती, पण इतिहास निर्माण करणार्‍या.. 'गंगा-जमुना..' या गाण्याची होती आणि तीही गप्पाष्टकातून नाही तर एका मान्यवराने सांगितलेली होती. त्या जमान्यातले प्रसिध्द चित्रपट निर्माते दिनकर पाटील यांनी सांगितलेली ही घटना जेष्ठ सिने समीक्षक इसाक मुजावर यांच्या पुस्तकात वाचण्यात आली. त्यांना त्यांच्या एका चित्रपटासाठी एक लावणी हवी होती आणि त्यासाठी ते गीतकाराच्या शोधात होते. त्या संदर्भात ते ठाण्याला गीतकार पी. सावळाराम यांच्या घरी गेले. तिथे सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू बसले होते आणि एका एच.एम.व्ही.च्या ध्वनिमुद्रिकेसाठी ती बैठक चाली होती. ती दोन गीते होती, 'गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का' आणि 'हसले ग बाई हसले'. अशी दोन अजरामर गाणी ज्या बैठकीत झाली ती बैठक ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. आज मला ते दृश्य डोळ्यांसमोर आलं तरी गहिवरून येतं.

'गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा' हे गीत चित्रपटासाठी का आलं नाही हे एक आश्चर्यच आहे. आपल्या लाडक्या मुलीच्या सासरी पाठवणीचे चित्रसदृश.. साधे, सोपे, बोली भाषेतले, पोटात कालवाकालव करणारे सुंदर शब्द पी. सावळारामांनी लिहिले आहेत. त्यांना तशीच सरळ, सोपी गेय चाल प्रभूंची आहे. जेव्हा चाल सोपी असते तेव्हा गायकाला आपलं कसब दाखवायला पूर्ण वाव असतो आणि तेच नेमकं लताजींनी करून सगळ्यावर कडी केली आहे. 'कडकडुनी तू मिठी मारता बाळे'.. मधला आवेग, 'पूस ग डोळे या पदराने लाडके..' मधली आईची माया, 'मोठ्यांची तू सून पाटलीण मानाची..' मधल्या 'मानाची' शब्दातला अभिमान हे केवळ त्याच दाखवू शकतात. अगदी छोटे पण गाण्याच्या चालीप्रमाणेच लक्षात राहणारे वाद्यवृंदातील पीसेस हे अजून एक या गाण्याचं वैशिष्ट्य. अगदी मंद पण गोड वाजलेला पियानोही या गाण्याचा वेगळेपणा सांगतो.

लेकीच्या पाठवणीची.. 'जा मुली शकुंतले सासरी' 'सासुर्‍यास चालली लाडकी शकुंतला' 'दाटून कंठ येतो' अशीही सुंदर गाणीही गाजली. पण पाठवणी गीताचा विषय निघाला की, 'गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का' हे आणि हेच गाणं ओठावर येतं इतकं ते महान आहे. प्रसिध्द निवेदक, मुलाखतकार, लेखक सुधीर गाडगीळ या गाण्याच्या निवेदनात म्हणायचे की, "त्या काळात हे गाणं इतकं गाजलं की ते बॅंडवर मुंजीतही वाजवलं जाऊ लागलं".
आचार्य अत्र्यांच्या भाषेत असं गाणं गेल्या दहा हजार वर्षांत झालं नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही !

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.