A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घनश्याम नयनी आला

घनश्याम नयनी आला
सखे, मी काजळ घालू कशाला?

रोमांचांनी नटली काया
हिरे-माणके कशास वाया?
कशास मोहनमाला?

कटीभोवती कर कृष्णाचे
लेणे ल्याले आभासाचे
कशास मग मेखला?

कृष्णसख्याची मादक मुरली
रात्रंदिन या कानी भरली
शृंगार सर्व झाला !
कटि - कंबर.
मेखला - कमरपट्टा.
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.
कोलंबिया जी. ई. ३३०८ ह्या नंबरच्या ध्वनिमुद्रिकेवर हे भावगीत १९५० च्या सुमारास प्रकाशित झालं व रेडियोवरून वरचेवर वाजू लागलं. त्याच सुमारास आलेले माडगूळकरांचेच "जा घेऊन संदेश पांखरा" हे गीतही खूप गाजलं. भावगीत गायिका अशी नवीन ओळख सरस्वतीबाई राणे ह्यांना मिळाली. बाबूजी (सुधीर फडके) हे ग्रामोफोन कंपनीचे पगारी नोकर असल्याने चाली लावणं हा त्यांच्या कामाचा भाग होता. परिणामी त्या ध्वनिमुद्रिकेवर त्यांचं संगीतकार म्हणून नाव कोरलं गेलं नाही. पण बाबूजींचे 'गीतकोश' सिद्ध केलेल्या मंडळींनी ही माहिती शोधून काढली.

सौ. सरस्वती राणे (माने) हिराबाई बडोदेकरांची धाकटी बहिण. खानसाहेब अब्दुल करीम खान व ताराबाई माने ह्यांचे शेंडेफळ. पाळण्यातलं नाव 'सकिना'. घरातलं लाडकं नाव 'छोटूताई'. खानसाहेबांपासून फारकत घेतल्यानंतर आईनं नाव 'सरस्वती' असं ठेवलं तर 'माने' हे माहेरचं आडनाव ताराबाईंनी सुरेश, कृष्णराव, व सरस्वती ह्यांना दिलं. पुढे सुंदरराव राणे ह्यांच्याशी लग्‍न झाल्यावर त्या सौ. सरस्वती राणे झाल्या. त्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या ध्वनिमुद्रिकांवर 'कु. सरस्वती माने' नाव आढळतं, तर नंतरच्या ध्वनिमुद्रिकांवर 'सौ. सरस्वती राणे' लिहिलेलं सापडतं. संगीताचे पहिले धडे सरस्वतीबाईंनी मोठी बहीण हिराबाईंकडून घेतले. पुढे ह्या भगिनींनी साठच्या दशकात स्त्री- जुगलबंदी गायनाची प्रथा सुरु केली ती अजून अबाधित आहे. पुरुष गायकांची जुगलबंदी खूप ऐकायला मिळते, पण स्त्रियांची मात्र फारच कमी वेळा ऐकायचा योग येतो. जयपूर घराण्याचे नथन खान, ग्वाल्हेर घराण्याचे प्रो.बी.आर. देवधर ह्यांच्यकडूनही त्या गाणं शिकल्या. घरच्याच 'नूतन संगीत नाटक मंडळी' च्या नाटकांमध्ये भावंडांबरोबर त्यांनी कामं केली, गाणी गायिली.

१९२९-१९३३ मध्ये ओडियन ह्या कंपनीकरिता त्यांनी शास्त्रीय व सुगम संगीताच्या काही ध्वनिमुद्रिका दिल्या. त्यातल्या काही पुढे 'कोलंबिया', 'यंग इंडिया' ह्या लेबलवर १९४०-५० च्या सुमारास पुन्हा वितरित करण्यात आल्या. त्या खूपच खपल्या. १९४०-६० मध्ये त्यांनी सुमारे तीस हिंदी, मराठी बोलपटांमध्ये उसना आवाज दिला. पार्श्वगायनामध्ये त्या काळातल्या त्याच आघाडीच्या गायिका होत्या. आचार्य अत्रे ह्यांच्या बहुतेक सर्व बोलपटांमध्ये त्या गायिल्या आहेत. 'पायाची दासी' बोलपटातलं 'अंगणात फुलल्या जाई-जुई, जवळी ग पति माझा नाही' हे गाणं फार गाजलं. प्रकाश फिल्म्सच्या 'राम राज्य' मधलं 'बीना मधुर मधुर वच बोल' ह्या गाण्यानं त्यांचं नाव देशभर झालं. ते इतकं गाजलं की शीघ्रकवी स. अ. शुक्ल ह्यांनी त्या चालीवर 'मैना मधुर मधुर वचन बोल' हे गीत रचलं. तेही खूप गाजलं. त्याचं संगीत श्रीधर पार्सेकर यांनी दिलं होतं.

१९५० नंतर त्यांनी शास्त्रीय गायनाला व विद्यादानाला वाहून घेतलं. १९७५ च्या सुमारास श्याम बेनेगल ह्यांच्या 'भूमिका' बोलपटात त्या 'शुद्ध कल्याण' रागातली चीज नातीबरोबर (मीना फातरफेकर) गायिल्या. १० ऑक्टोबर २००६ रोजी नव्वदीत असतांना त्यांचा स्वर्गवास झाला. त्या अगोदर मे २००६ मध्ये मुंबईत, हिराबाईंच्या जन्मशताब्दी सांगता समारंभात त्या राग तोडी गायल्या होत्या. त्यांच्या निधनानं किराणा घराण्याची स्थापना करणारे खानसाहेब अब्दुल करीम खान ह्यांच्या घरातला शेवटचा तारा निखळला. सुमारे दोनशेहून अधिक गाणी सरस्वतीबाईंनी गायलेली आहेत. रागदारी, भावगीतं, चित्रपटगीतं, जुगलबंदी इ. गाणी त्यात आहेत. बरीचशी तीन/साडेतीन मिनिटांची ७८ गतीच्या, लाखेच्या ध्वनिमुद्रिकांवर आहेत. संग्राहकांनी ती मर्म बंधातली ठेव समजून जीवापाड जपून ठेवली आहेत.
(संपादित)

सुरेश चांदवणकर
सौजन्य- marathiworld.com
(Referenced page was accessed on 28 August 2016)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.