A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घनु वाजे घुणघुणा

घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥

चांदु वो चांदणे । चांपे वो चंदने ।
देवकीनंदनेविण । नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज । सितळ वो निकी ।
पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुह्मी गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावी उत्तरें ।
कोकिळें वर्जावें । तुह्मीं बाईयांनो ॥५॥

दर्पणीं पाहतां । रूप न दिसे वो आपुलें ।
बाप रखुमादेवीवरें । मज ऐसें केलें ॥६॥
चांपे - चाफ्याचे फूल.
निकी - चांगली.
सुमन - फूल.
भावार्थ-

सगळी सृष्टी बहरून आली आहे आणि त्यांनी माझ्यावरही विरहोपचार केले आहेत. पण मनाची तगमग वाढतेच आहे. मंद शीतल असा वारा वाहतो आणि त्यामुळे मेघही मंदसा नाद करीत आहेत. त्यामुळेच त्याच्या नसण्याची जाणीव तीव्र होत आहे. सर्वांगाला लावलेले चंदन, भोवतीची चाफ्याची फुलं, वरचा चंद्रमा, सारे सारे व्यर्थ आहे. किंबुहना ह्या सार्‍याच गोष्टी माझा विरह तीव्र करीत आहेत. सारं अंग तापून निघालं आहे. सख्यांनो, संसारातून तारून नेणार्‍या कृष्णाची भेट त्‍वरेने घडवा. माझ्यासाठी तुम्ही फुलांची शेज केली आहे पण ही शेज भडकलेल्या आगीसारखी मला जाळीत आहे. माझ्यासाठीच तुम्ही कोकिळेच्या स्वरात गाताहात पण नका गाऊ. माझा क्षोभ अधिकच वाढतो आहे. माझी अवस्था काय सांगावी? मी इतकी कृष्णमय होऊन गेले आहे की दर्पणात मी मला दिसतच नाही. माझे रूप पाहावे म्हणून मी आरसा समोर धरते तर आरशात पाहतापाहता कृष्णच दिसतो.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे