A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे नायका जगदीश्वरा

हे नायका जगदीश्वरा
भवतारका अभयंकरा
तुझिया प्रसादे उज्‍ज्‍वला
नवरत्‍न गर्भा ही धरा

तिमिरात तेजोगोल तू
वणव्यात शीतल चंद्र तू
सृजनातही आरंभ तू
ओंकार-रूप शुभंकरा

गीतातला शब्दार्थ तू
शब्दांतला भावार्थ तू
भावातला गूढार्थ तू
सत्यातल्या शिव-सुंदरा

अशिवास दे शुचिमानता
प्रीतीस अर्पणशीलता
विश्वास दे एकात्मता
दे बंधुता जनसागरा
गीत - सुधीर मोघे
संगीत - राम फाटक
स्वर- पं. भीमसेन जोशी
गीत प्रकार - भक्तीगीत
अभयंकर - शंकराचे एक नाव.
शिव - मंगल, कल्याणकारी.
सृजन - निर्मिती.
मी आस्तिक आहे की नास्तिक? ते मला ठाऊक नाही. या दोन संज्ञांना जे रुढ अर्थ आपल्याकडे परंपरेने आले आहेत, त्या अर्थाने माझं हे म्हणणं आहे. पण ते पारंपरिक अर्थ नाकारायचे ठरवले तर मात्र मला भावणारा एक नवा अर्थ त्यांना लाभतो. गेल्या काही वर्षांपासून मी हे दोन शब्द पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या अर्थाचे प्रतीक मानू लागलो आहे आणि हे गृहीत धरलं तर मी नक्की आस्तिकच आहे. किंबहुना आपण सगळे मूलत: आस्तिकच, म्हणजे पॉझिटिव्ह आहोत. कारण तसं पाहिलं तर रोजच्या जगण्याबद्दल आपल्या असंख्य तक्रारी आहेत. पण तरीही आपण नेटाने जगत असतो आणि नुसते असेतसे नाही तर रोज नव्या उमेदीनं नवी स्वप्‍ने पहात आणि जगण्यातले छोटे-मोठे आनंद घेत जगत असतो. कदाचित कधी आपण आपल्या प्राणांची किंमत मोजून आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊ शकलो इतकंच नव्हे तर तो पारही पाडू शकलो तरच आपण खरे निगेटिव्ह ठरू. पण अतिशय दुर्लभ अपवाद सोडता आपल्या कुणालाच हे जमणार नाही, हे निदान स्वत:शी तरी कबूल केलेलं बरं. पण देव कल्पना आणि त्यातून येणारी भक्तिभावना या गोष्टी पायाभूत धरून विचार केला तर मग माझी ही दुटप्पी भासणारी भूमिका जन्म घेते. म्हणजे मी नास्तिकही नाही, आस्तिकही नाही किंवा उलटपक्षी मी आस्तिकही आहे आणि नास्तिकही आहे.

आपल्याभोवती पसरलेलं हे सगुण आणि निर्गुण विराट विश्वरहस्य ही माझी, माझ्यापुरती ईश्वर कल्पना आहे. माझ्या या मूलभूत जाणिवेच्या अनेक खुणा माझ्या कविता-गीतांतून ठायीठायी दिसतात. अगदी आरंभ काळात पुणे रेडिओवर संगीतकार राम फाटक आणि गायक पं. भीमसेन जोशी यांच्यासाठी मी एक प्रार्थनागीत लिहिलं होतं, तेव्हा ही माझी सुप्त भूमिका नकळत, पण प्रथमच व्यक्त झाली.

हे नायका.. जगदीश्वरा
भवतारका.. अभयंकरा
तुझिया प्रसादे उज्ज्वला
नवरत्‍नगर्भा ही धरा..
(संपादित)

सुधीर मोघे
सौजन्य- दै. लोकसत्ता (२९ सप्‍टेंबर, २०१३)
(Referenced page was accessed on 1 February 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.