A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जंववरी रे तंववरी

जंववरी तंववरी जंबूक करी गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥

जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥

जंववरी तंववरी मैत्रत्व-संवाद ।
जंव अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥

जंववरी तंववरी युद्धाची मात ।
जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥४॥

जंववरी तंववरी समुद्र करी गर्जना ।
जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥५॥

जंववरी तंववरी बाधी हा संसार ।
जंव रखुमादेविवर देखिला नाहीं बाप ॥६॥
अगस्ती - महाभारतात अगस्ती ऋषींनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देव-दानव युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेला कालकेय हा दानव समुद्राच्या तळाशी जावून लपला. तेव्हा अगस्तींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयाला ठार मारले आणि देवांवरील संकट दूर केले.
अर्थ - धन, द्रव्य.
जंबूक - कोल्हा.
जंवर - जोपर्यंत.
तंवर - तोपर्यंत.
पंचानन - सिंह.
परमाई - वीर माता.
पृथक्‌
असाच एक अभंग तुकाराम गाथेतही अढळतो-
तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥
तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राह्मणा देखिलें नाहीं ॥२॥
तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥३॥
तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाइऩचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥४॥
तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं॥५॥
(गाथा- क्र. २७८३)

  पृथक्‌

भावार्थ-

शैलीच्या दृष्टीने आणि दृष्टांतसामर्थ्यांच्या दृष्टीने हा अभंग अभ्यासण्यासारखा आहे. त्याबरोबर ज्ञानेश्वरांचे लोकव्यवहाराचे ज्ञान किती सूक्ष्म आणि तंतोतंत होते हेही लक्षात येते.

पुष्कळ माणसे वैराग्याच्या गोष्टी बोलत असतात पण हे कुठपर्यंत तर सुंदर स्त्री दिसेपर्यंत. काही माणसे मैत्रीच्या गोष्टी करतात पण अर्थसंबंध आला की त्यांची मैत्रीची भाषा लटकी पडते. जोपर्यंत शत्रू दिसत नाही तोपर्यंत युद्धाच्या आरोळ्या ठोकणारेही पुष्कळ सापडतात.

या तिन्‍ही दृष्टांतांमधून मानवी स्वभावाचे अचूक आकलन घडते आहे. तसेच माणसाला कमकुवत बनविणारे मोह म्हणजे स्त्री व पैसा होत याचीही जाणीव ज्ञानेश्वरांना होती. अर्थात ही जाणीव प्रकट करण्यासाठी अभंग येत नाही तर विठ्ठलाला पाहताच संसाराचा मोह कुठल्याकुठे पळून जातो, हे सांगण्यासाठी हे दृष्टांत आले आहेत. याशिवाय कोल्हा आणि सिंह, समुद्र आणि अगस्‍ती यांचेही दृष्टांत येथे ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाच्या श्रेष्ठत्वासाठी वापरले आहेत.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.