A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले

जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं, नीति-संपदांची
स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशीं होशी
स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतंत्रते भगवती । तूंच जी विलसतसे लाली
तूं सूर्याचें तेज, उदधिचें गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेंची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्‍नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होतें
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्त-रंजिते । सुजन-पूजिते । श्रीस्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन । तुजवीण जनन तें मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
गीत - स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - मधुकर गोळवलकर
स्वराविष्कार- लता मंगेशकर
आकाशवाणी गायकवृंद
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - हंसध्वनी
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• काव्य रचना- १९०३, पुणे.
• प्रथम ध्वनीमुद्रण पुणे आकाशवाणीवर वृंद स्वरात ७ मार्च १९६३ रोजी.
अधम - नीच, पापी.
उदधि - समुद्र.
जनन - जन्म होणे.
पद - पाय.
परवशता - गुलामगिरी.
युत - युक्त, जोडलेले.
रक्तरंजित - रक्तबंबाळ.
राज्ञी - राणी.
वेदांती - ब्रह्मज्ञानी.
शिव - मंगल, कल्याणकारी.
सकल - सर्व.
नोंद

अन्यथा ग्रहण नष्ट तेची-
सूर्याचें तेज ग्रहणात दिसेनासें होतें आणि समुद्राची थोरवीही अगस्ति ग्रहणात अंजलीत हस्तगत होताच विलुप्त झाली.

संदर्भ-
सावरकरांची कविता
संपादक- वासुदेव गोविंद मायदेव
सौजन्य- केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  लता मंगेशकर
  आकाशवाणी गायकवृंद
स्वातंत्र्यवीर सावरकर