A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशि या त्यजू पदांला

कशि या त्यजू पदांला । मम सुभगशुभपदांला ॥

वसे पदयुग जिथें हे । मम स्वर्ग तेथ राहे ॥

स्वर्लोकिं चरण हे नसती । तरि मजसि निरयवसती ती ॥

नरकही घोर सहकांता । हो स्वर्ग मला आतां ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वराविष्कार- बालगंधर्व
पं. कुमार गंधर्व
कान्होपात्रा किणीकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - एकच प्याला
राग - पहाडी
ताल-धुमाळी
चाल-दिल बेकरार तूने
गीत प्रकार - नाट्यसंगीत
निरय - नरक.
सुभग - दैवी / सुंदर.
शेक्सपीअर आणि गडकरी

शोकांतिका लेखनाच्या काही परंपरा आहेत. ग्रीक नाटकातली शोकांतिका ही प्रामुख्याने नियतीवर आधारलेली असे. शेक्सपीअरच्या शोकांतिकांना मानवी मन हे कारणीभूत झालेले दिसून येते. परंतु गडकर्‍यांसारख्या प्रतिभासंपन्‍न नाटककारासमोर असे आदर्श असले तरी कोणत्याही आदर्शांच्या चौकटीत ते आपल्या कलाकृतींना बसवत नाही. कारण तो स्वतःचे तंत्र घेऊनच जन्माला आलेला असतो. शेक्सपीअरच्या शोकांतिकेचा नायक अशा एखाद्या जबाबदारीच्या जागेवर असतो की त्याच्या नाशामुळे एखाद्या राज्याचा किंवा देशाचा नाश होण्याचा संभव निर्माण झालेला असतो. सुधाकरावर स्वतःसकट फक्त तीन जीवांची जबाबदारी आहे. नायकाच्या मनात असलेला झगडा हे शेक्सपीअरच्या शोकांतिकाचे दुसरे वैशिष्ट्य समजता येईल. मदिरेमुळे ज्याची बुद्धी बधिर झालेली आहे अशा सुधाकराच्या मनास कोणताही झगडाअ उत्पन्‍न होणे अशक्यच समजले पाहिजे. शेक्सपीअरच्या नाटकातल्या नायकावर त्याला न पेलता येण्याजोगी जवाबदारी येऊन पडलेली असते, अशी कोणतीच जबाबदारी सुधाकरावर नाही. हॅम्लेटच्या शोकांतिकेचे मूल्यमापन करताना जी. के. चेस्टरटन म्हणतो,

The tragedy of Hamlet does not lie in the fact that it begins with a murder and ends with a murder. It is something deeper, more spiritual than that. The most tragic, the most afflicting thing in the world is the ruin of a high soul. That is the theme of Hamlet.. Hamlet is no ordinary prince. His wit is keen edged and dipped in irony. The delicacy of moral insight is unusual. The key note of his character is over cultivation of mind. His worship of intellect, his absorbing interest in music and theatre, his nervous excitability.. It is a tragedy of spiritual impotence, of deadened energies and paralysed will."

अशा एकाही गुणाचा उच्चार सुधाकराच्या संबंधात करता येईल काय? मग एकच प्याला' नाटकाला शेक्सपीअरच्या Character tragediesच्या पंक्तीत बसवण्याचा अट्टाहास कशाला करावा? आणि खरे म्हटले तर त्याची गरजही नाही.

शेक्सपीअरच्या शोकांतिका तुलना न करता 'एकच प्याला' ही एक सुंदर आहे, असे म्हणता येतील. मोर आणि राजहंस हे दोन्ही पक्षी आपापल्या हक्काने सुंदरच असतात. मग मोराची चार पिसे राजहंसाच्या पिसात खुपसून, राजहंस मोरच आहे असे प्रस्थापित करण्याचा अट्टाहास कशाला करावा?
(संपादित)

वसंत शांताराम देसाई
'गडकर्‍यांची नाट्यसृष्टी' या वसंत शांताराम देसाई लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि., मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  बालगंधर्व
  पं. कुमार गंधर्व
  कान्होपात्रा किणीकर