A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काया ही पंढरी आत्मा हा

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥

भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे ।
बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥

दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥

ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥

दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥

देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं ।
एका जनार्दनी वारी करी ॥६॥
उदक - पाणी.
बरवा - सुंदर / छान.
वेणु - बासरी.
वैष्णव - विष्णुभक्त.
'अणुरणिया थोकडा' या तुकाराम महाराजांच्या अभंगात मालकंसमध्ये सहजसुलभरीतीने पंचम लागतो. त्यात विशेष मजा असावी. भीमसेनजींनीही माझ्याजवळ तसा उल्लेख केलेला मला आठवतो. हा अभंगही खूप लोकप्रिय झाला.

आणखी अभंगांना चाली करणं सुरूच होतं. भीमसेन यांनी मला 'काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल' हा एकनाथ महाराजांचा अभंग दिला. गोपिनाथ तळवलकरांनी त्यांना तो दिला होता. हा एक अभंग सोडला, तर पंडितजींच्या आवाजात मी ध्वनिमुद्रित केलेले सगळे अभंग मीच निवडलेले आहेत. मला वाटतं अभंग निवडणं हीही एक स्वतंत्र क्षमता आहे.

भीमसेन म्हणाले, की 'अणुरणिया थोकडा' या अभंगानंतर हा अभंग म्हणायचा झाला, तर त्याला चाल करताना मालकंस रागानंतर म्हणता येईल, अशा कुठल्यातरी रागाचा आविष्कार त्यात येऊ द्या. छान होईल ते. त्या दृष्टीने मी विचार करू लागलो. दोन-तीन दिवस झाले, तरी मनासारखा मुखडा साकार होत नव्हता. खटपट चालू होती. सगळ्याच चाली खरं तर पटकन होतात असं नाही. 'तीर्थ विठ्ठल' सारखी पाचदहा मिनिटांत चाल होते, ती एखादेवेळी. योग असतो तो.

'काया ही पंढरी' सतत डोक्यात होती. आणि अचानक अंथरुणावर पडलो असताना मला मुखडा, विशेषतः ती कोमल ऋषभाची जागा सुचली. तसाच उठलो. पेटी घेतली आणि निदान मुखडा तरी विसरणार नाही याची खबरदारी घेऊन ती जागा डोक्यात साठवून ठेवली. त्या अनुषंगाने मग पुढे चाल बांधली. तालमीचे वेळी पंडितजींनी ती ऋषभाची जागा खूप नेकीने आत्मसात केली. जागा चांगली, त्यात पंडितजींचा सिद्ध स्वर.

पंडितजींचं पंजाबमध्ये गाणं होतं. अशा परप्रांतात आणि विशेषतः अमराठी भागातल्या लोकांकडूनही भीमसेनना या अभंगाची फर्माइश झाली, असं ज्या वेळी मी त्यांच्या सौभाग्यवतींकडून ऐकलं त्या वेळी मला खूप आनंद झाला.

चाली आत्मसात करताना या जुन्या आणि मोठ्या कलाकारांची नेकी आणि कसोशी खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे.
(संपादित)

राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.