A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
किती गोड गोड बाळ

किती गोड गोड बाळ जसे कमल उमलले
ओठांच्या पाकळ्यांत ब्रह्म साठले

कुंदाच्या उगवाया लागल्या या कळ्या
माथ्यावर कुरळ्यांच्या रुळति साखळ्या
मखमाली गाली कशा खेळती खळ्या
सौख्याचे सार सकल वदन चिमुकले
'अश्रूंची झाली फुले'च्या पाठोपाठ 'लेकुरे उदंड जाली' हे माझे आणखी एक नाटक रसिकांना सादर होत आहे. या नाटकाची पहिली काही पाने मी १९६४ च्या मार्च-एप्रिल महिन्यांतच लिहिली होती. त्याच वेळी नाट्यकथेचा नुसता गोषवारा ऐकून गोवा हिंदू असोसिएशनच्या कलाविभागासाठी या नाटकाची श्री. रामकृष्ण नायक यांनी मागणी केली होती.

या नाटकाचे प्रत्यक्ष लेखन मात्र नोव्हेंबर ६५ ते एप्रिल ६६ पर्यंतच्या काळात मी पुरे केले. दरम्यानच्या काळात विख्यात चित्रपट My Fair Lady मी पाहिला. त्यातील Lyrics ऐकून आणि पाहून असंख्य रसिकांप्रमाणे मी देखील भारावूनच गेलो. हा भाव-काव्याचा मिस्किल प्रकार हास्यप्रधान नाटकात वापरण्यासारखा आहे, याची मी तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली.

मुंबईहून नाशिकला परतत असतानाच 'गौरीशंकर' नावाच्या एका संकल्पित विनोदी नाटकातले 'सुसरीनं धरलाय घरात माझा पाय...' हे गीत मी लिहून टाकले आणि त्या अनुषंगाने नाटकाचे नामकरण देखील 'सुसरीने धरलाय माझा पाय' असे बदलून ठेवले. अजून हे नाटक पहिल्या अंकातच रेंगाळले आहे. पण 'लेकुरे उदंड जाली' पुरे करण्यासाठी मी बसलो त्या वेळी या नाटकात देखीळ अशी Lyrics वापरता येतील अशी शक्यता दिसली. पहिली एक-दोन Lyrics लिहिल्यावर आणि मित्रमंडळींना ती आवडताहेत असे दिसल्यावर झटून प्रयत्‍न केला. या नाटकातला हा प्रयोग रसिकांना आवडला तर 'सुसरीने धरलाय माझा पाय' या नाटकाचे लेखन अधिक इर्षेने मी हाती घेणार आहे.

उघडच हे एक हलके फुलके नाटक आहे. (या नाटकाला झोडण्यासाठी माझे विरोधक टीकाकार, नेहमीप्रमाणे आता 'प्रेमा, तुझा रंग कसा?' ची तुलनेने प्रशस्ती करू लागतील याची मला खात्रीच आहे. पण त्यांचे सोडा !) प्रेमळ, उमद्या, अनुरूप पतिपत्‍नीच्या सांसारिक जीवनातील निपुत्रिकत्व हा एक सनातन करुणेचा विषय आहे. करुणेच्या गडद-सौम्य रंगच्छटातूनच आजवर तो विविध प्रकारच्या साहित्यातून अवतरला आहे. पण कोणे एके काळी एका रसिक मित्राच्या घरी पाहुणचार घेत असता, हीच 'करुणा' काही एका आगळ्या मिस्कील रसरंगरूपात माझ्यासमोर रंगलेली मला दिसली आणि त्याच क्षणी या नाटकाचा जन्म झाला.

'लेकुरे उदंड जाली' हे नाटकाचे नाव वाचून आणि ऐकून अनंत प्रकारचे तर्क उसळले. तर्क करणारांनी समर्थ रामदासांचे 'लेकुरे उदंड जाली । तो ते लक्ष्मी निघोन गेली' हे वचन पुरते वाचले तर या नाटकाच्या शीर्षकाचे मर्म ध्यानी येऊन त्यांना ते अधिक रुचेल असे मला वाटते.

या नाटकाच्या लेखनात आणि रंगमंचावरील त्याच्या आविष्कारात ख्यातनाम नाट्यलेखक, दिग्दर्शक श्री. मो. ग. रांगणेकर आणि विख्यात संगीत दिग्दर्शक श्री. जितेंद्र अभिषेकी यांनी अपार कष्ट घेतले. वाचताना सोपा वाटलेला पण वस्तुतः Unconventional आणि म्हणूनच बसवण्यास अत्यंत अवघड असलेल्या या नाटकातील Lyric चा प्रकार सर्वतोपरी यशस्वी व्हावा यासाठी या नाटकातले कलाकार आणि दि गोवा हिंदु असोसिएशनच्या कलाविभागाचे कार्यकर्ते यांनी अविश्रांत श्रम घेतले आणि खूप खर्चही केला. या सर्वोचे कृतज्ञतापूर्वक आभार मानणे मी माझे कर्तव्य समजतो.

'रायगडाला जेव्हा जाग येते'च्या निमित्ताने दि गोवा हिंदु असोसिएशन कलाविभागाच्या कार्यकर्त्यांचा माझा १९६१ साली प्रथम परिचय झाला. नाटकाची आवड, रंगभूमीची भलाई आणि समाजसेवा यापलीकडे कसलीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसणारे आणि या कार्यासाठी तनमनधन वेचून अहोरात्र राबणारे, कष्टाळू, रसिक आणि ध्येयवादी कार्यकर्ते, याच संस्थेत मला प्रथम भेटले. तात्त्विक मतभेदाचे वा भांडणतंट्यांचे प्रसंग उद्भवूनही त्यांचा आणि माझा स्‍नेह अखंड राहिला आणि उत्तरोत्तर गाढच होत गेला. मजवरील त्यांच्या या अकृत्रिम लोभाचे आणि उदार स्‍नेहशीलतेचे अंशतः उतराई होण्यासाठी माझे मित्र रामकृष्ण नायक, अवधूत गुडे, भिकोबा पै आंगले, प्रभाकरबाब शिरवईकर आणि आम्हा सर्वोचे दादा-चित्रकार दीनानाथ दलाल यांना ही नाट्यकृती मी कृतज्ञतापूर्वक अर्पण करीत आहे.
(संपादित)

वसंत कानेटकर
दि. ३० ऑक्टोबर १९६६
'लेकुरें उदंड जालीं' या नाटकाच्या पुस्तकाच्या तृतीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  प्रशांत दामले, योजना शिवानंद