A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मालवून टाक दीप

मालवून टाक दीप चेतवून अंग अंग !
राजसा, किती दिसांत लाभला निवांत संग !

त्या तिथे फुलाफुलात
पेंगते अजून रात;
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्‍नभंग !

गार गार या हवेत
घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !

दूर दूर तारकांत
बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !

हे तुला कसे कळेल?
कोण एकटे जळेल?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग?

काय हा तुझाच श्वास?
दर्वळे इथे सुवास !
बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग !
चेतवणे - उद्दीपित करणे, पेटवणे.
प्रिय सुरेश भट यांस सस्‍नेह नमस्कार.
तुमच्या 'रंग माझा वेगळा' या कवितासंग्रहातला दुसरा भाग आहे तो कवितांचा. मी कविता आवडीने वाचते. गीतांशी तर गाण्यामुळे हरघडी संबंध येतो. गीते वाचताना मला ती त्यातल्या काव्यकल्पनांमुळे जशी आकर्षून घेतात, तसे त्यात दडलेले 'गाणे'ही मला सारखे जाणवत राहते. 'वाजवि मुरली देवकिनंदन', 'मालवून टाक दीप' ही तुमची गीते वाचताना मला त्यातले काव्य तर आवडलेच; पण त्यांची 'गेयता'ही मला हृदयंगम वाटली. काव्य आणि गीत यांना जोडणारा धागा गेयता हाच आहे. गीताची शब्दरचना निर्दोष असली, नादमधूर मृदू व्यंजनांनी युक्त असली, त्यातले खटके योग्य जागी येत असले, यमके व्यवस्थित आली तर असे गीत चाल बसवण्याच्या दृष्टीने संगीतदिग्‍दर्शकाला प्रेरणा देते. गायकालाही ते गीत गाताना मनाला मोठे समाधान वाटते. 'आज गोकुळात रंग', 'मेंदीच्या पानावर', 'मालवून टाक दीप' ही तुमची गीते ध्वनिमुद्रिकेसाठी गाताना मला हे समाधान आणि आनंद फार मोठ्या प्रमाणात लाभला.

चांगल्या गीताची माझ्या दृष्टीने एक कसोटी आहे. गीत इतके चांगले 'बांधलेले' असावे की ते 'बांधले' आहे हेही कुणाच्या ध्यानात येऊ नये. तुमची गीते रचनेच्या दृष्टीने इतकी देखणी व बांधेसूद आहेत की, ती या कसोटीला निष्चित उतरतात. गीत कोणते आणि काव्य कोणते, गीतकाराला कवी मानावे की नाही, या वादात माझ्यासारखीने पडू नये. पण उत्तम गीत हे मुळात उत्तम काव्यही असावे लागते, याबद्दल सहसा कुणाचा मतभेद होईल असे वाटत नाही. तसे पाहिले तर ज्ञानदेवांसारख्या महाकवीची 'मोगरा फुलला', 'पैल तो गे काऊ', 'घनु वाजे घुणघुणा' किंवा 'रूप पाहता लोचनी' ही गीतेच आहेत ना? पण त्यातले काव्य अस्सल नाही, असे कोण म्हणेल?

'मालवून टाक दीप' हे तुमचे गीत उत्तम काव्य म्हणूनही तितकेच परिणामकारक आहे. 'बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग' यासारखी त्या गीतातली नाजूक आणि रम्य कल्पना गीत गाऊन झाल्यावरही दीर्घकाळ माझ्या मनात तरळत राहिली.
(संपादित)

लता मंगेशकर
'रंग माझा वेगळा' या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर

  इतर संदर्भ लेख