A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी पप्पाचा ढापुन फोन

मी पप्पाचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन !
हॅलो हॅलो बोलतंय्‌ कोण?

"आमचे नाव घेलाशेठ, डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो साजुक तूप, चापुन खातो आम्हीच खूप !
तुम्ही कोण, काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव?"

कसले नाव नि कसला गाव? राँग नंबर लागला राव !

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
हॅलो हॅलो बोलतंय्‌ कोण?

"लक्षुंबाई मी जोशाघरची, चोरून खाते अंडाभुर्जी
वरती कपभर दूध न्‌ साय, घरात आत्ता कोनी नाय
तुम्ही कोन, काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव?"

कसले नाव नि कसला गाव? राँग नंबर लागला राव !

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
हॅलो हॅलो बोलतंय्‌ कोण?

"मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त हजार
तुम्ही कोण काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव?"

कसले नाव नि कसला गाव? राँग नंबर लागला राव

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
हॅलो हॅलो बोलतंय्‌ कोण?

"ढगामधून बोलतोय बाप्पा, चल मारू थोड्या गप्पा"

"बाप्पा बोलतोयस? तर मग थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
कालच होता सांगत पप्पा, तिकडे आलेत आमचे अप्पा
एकतर त्यांना धाडून दे, नाही तर फोन जोडून दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिलेय्‌ आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा
म्हणाले होते- जाऊ भूर्र, एकटेच गेले केवढे दूर !
डिट्टेल सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा.. बाप्पा बोला राव, सांगतो माझं नाव न्‌ गाव"

कसले नाव नि कसले गाव? राँग नंबर लागला राव !
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे
अल्बम - अग्गोबाई ढग्गोबाई
गीत प्रकार - बालगीत
ये ये ताई पाहा पाहा, गंमत न्यारी किती आहा
चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ बुडला

अगदी लहानपणी माझी आज्जी मला आणि माझ्या बहिणीला हे गाणं म्हणून झोपवायची. आता माझ्या मुलांची आजी, माझी आई माझ्या मुलांना हे गाणं म्हणून झोपवते. मी ऐकलेली ही पहिली बालकविता असावी.
ह्यात 'ताई'चा उल्लेख फार आवडायचा. आपली माणसं, आपलं घर, कवितेत भेटणं फार आनंदाचं वाटतं, हे त्या वयात नीटसं समजलं नाही तर कुठेतरी जाणवलं. आपलं जगणं आणि आपण वाचतो त्या कविता,
ऐकतो ती गाणी, हे सगळं एकच असतं हे हळूहळू लक्षात आलं आणि जाणवायला लागलं की ही गाणी-कविता आपल्या नकळत आपल्यावर संस्कार करत असतात.

१९९९ मध्ये 'स्वप्‍नात पाहिली राणीची बाग' हा विंदा आणि मंगेश पाडगावकरांच्या बालकवितांचा संग्रह करताना,
अ ब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई
आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठ्ठ नाही

ही कविता स्वरबद्ध करताना जाणवलं की ज्या काळात ही कविता लिहिली गेली, तो काळ आजी-आजोबा, आई-बाबा आणि मुलं सगळे एकत्र एका घरात राहायचा होता. मुलांच्या डोळ्यांसमोर आजोबा असणारच असं समजूनच हा संदर्भ कवितेत यायचा. सामाजिक परिस्थितीनुसार बालकवितेतील संदर्भ बदलत गेले.

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?

ह्या गाण्यात आई दुपारी झोपेल का? हा प्रश्न मनात येतो म्हणजे आई दुपारी घरात असण्याचा तो काळ. आता संदर्भ बदलला. आता संदीप खरेच्या कवितेत,
दूर देशी गेला बाबा,
गेली कामावर आई

हा संदर्भ स्वाभाविकपणे आला.
आपली माणसं, आपलं घर आपल्या गाण्यातून मांडण्याची संधी मला अनेक उत्तमोत्तम कवितांनी दिली.

एखादी कविता संगीतकाराची परीक्षा बघते, 'अग्गोबाई ढग्गोबाई' ह्या संग्रहाच्या वेळी तशी कविता माझ्या समोर आली ती म्हणजे संदीप खरेची
मी पप्पांचा घेऊन फोन,
फोन केले एकशे दोन

एक लहान मुलगा वडिलांचा फोन घेऊन वाट्टेल ते नंबर फिरवतो आणि वेगवेगळे नंबर फिरवतांना, पलीकडून 'मी बाप्पा बोलतोय' असा आवाज येतो आणि मग मुलाच्या मनांत पहिला प्रश्न येतो तो 'बाबा म्हणतात आजोबा देवाघरी गेले आहेत, तेव्हा बाप्पाला फोन लागलाय, तेव्हा त्याला सांगावं की माझ्या आजोबांना परत पाठवा, आमची गोष्ट अर्धवट राहिली आहे.' नेमक्या ह्याच कडव्याशी मी बराच काळ थांबलो. अचानक हे गंभीर वळण गाण्यात कसं आणावं? एका प्रसन्‍न चालीत एकदम 'व्याकूळ' विचार कसा मांडावा? महिनाभर विचार केला आणि एकदम प्रश्न सुटला. 'त्या' छोट्या मुलाला, मृत्यूचा संदर्भच माहीत नाही. आत्याकडे, काकाकडे गेलेल्या आजोबांना तो छोटा मुलगा किती सहजतेने 'परत या' म्हणेल, तसंच तो बाप्पाला सांगतोय. त्याच्यासाठी फार सरळ, स्वाभाविक आहे ते आणि हे होऊ शकेल असं वाटणारं ते भाबडं वय. हा प्रश्न सुटला आणि गाणं पूर्ण झालं. ह्या गाण्यावर पोरांनी आणि थोरांमधल्या पोरांनी खूप प्रेम केलं, त्यांना ह्या गाण्यातून आपापले आजोबा पुन्हा भेटले असावेत.

संदीप खरेच्या मनात आजी-आजोबांना खास जागा आहे, ती वारंवार त्याच्या कवितेतून व्यक्त होते.
आजी म्हणते जन्मभर काढल्या खस्ता, केले कष्ट
तू म्हणजे त्या सगळ्याची शेवट गोड असली गोष्ट
नुसतंच कथा पुराण झालं, देव काही दिसला नाही
कुशीत येतोस तेव्हा कळतं ,कृष्ण काही वेगळा नाही

ह्या ओळी माझ्याकडून स्वरबद्ध झाल्या आणि मला खूप वर्षांनी आजीचा हात पाठीवर जाणवला. गाण्यांमधून, आपली माणसं पुन्हा भेटण्यासारखा आनंद नाही.

'आई' हा विषय बालकवितांमधून वारंवार भेटतो. माझ्या लहानपणी 'ए आई मला पावसात जाऊ दे' किंवा 'आई ग बघ ना कसा हा दादा?' अशा गाण्यांमधून आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारी, सगळ्या अडचणीत आपल्या पाठिशी उभी राहणारी आई भेटत गेली. 'चिंटू' ह्या चित्रपटासाठी शुभंकरने गायलेलं
एकटी एकटी घाबरलीस ना?
हे गाणं सगळ्याच वयोगटातल्या मुलांना आणि आईलाही आपलं वाटलं हे आमचं भाग्य.
मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही
ही संदीपची ओळ मनात कायमची घर करून बसली.

कुसुमाग्रजांची 'उठा उठा चिऊताई' ही कविता स्वरबद्ध करताना पुन्हा एकदा मला 'आईपण' ह्या गोष्टीमधलं एक मोठं तत्त्वज्ञान उलगडलं.
सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी,
डोळ्यांवर झोप कशी अजूनही?

चिऊताईला झोपेतून उठवण्याचे असे अनेक प्रयत्‍न फोल झाल्यावर,
झोपलेल्या अश्या तुम्ही,
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या बाळाचे घेता नाव,
जागी झाली चिऊताई
उडुनिया दूर जाई भूर भूर

ह्या ओळी गाताना नेहमीच गळा दाटून येतो.

लहान मुलांना हे गाणं शिकवतांना 'उडुनिया दूर जाई भूर भूर' ह्या ओळींनंतर पुन्हा गाण्याचा मुखडा 'उठा उठा चिऊताई' हा येणार नाही, का सांगा? असं विचारल्यावर ज्यांनी मन लावून ही कविता ऐकली आहे, गायली आहे ती मुलं सहज सांगतात 'एकदा भूर भूर उडून गेल्यानंतर' पुन्हा कसं उठवणार चिऊताईला? अगदी अचूक उत्तर. केवळ सांगीतिक आनंदासाठी पुन्हा मुखडा गाणं हा कवितेवर अन्याय होईल.

कवितेचं गाणं होताना, हा विचार सहजच व्हायला हवा. बोलता-बोलता, गाता-गाता कवितेतून, गाण्यातून नात्यांविषयी, घराविषयी जे संस्कार केले जातात ते आयुष्यभर मनात राहतात. अगदी ही छोटी मुलं स्वतः आजी-आजोबा होईपर्यंत टिकतात.
(संपादित)

सलील कुलकर्णी
सदर- कवितेचं गाणं होताना
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (२८ मे, २०१७)
(Referenced page was accessed on 08 August 2025)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सलील कुलकर्णी, संदीप खरे