A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नामाचा गजर गर्जे भीमातीर

नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महिमा साजे थोर तुज एका ॥१॥

रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती ।
उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥

चारी वेद भाट होऊनि गर्जती ।
सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥

सुरवरांचे भार अंगणीं लोळती ।
चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥

नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू ।
करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥
उच्छिष्ट - उष्टे.
क्षिति - पृथ्वी.
चार मुक्ती - सलोकता - समीपता - सरूपता - सायुज्यता.
भाट - स्तुतिपाठक.
रज - धूळ.
रिद्धिसिद्धि - ऋद्धी व सिद्धी या गणपतीच्या दोन दासी आहेत.
सनकादिक - सनकादिक ऋषि. ब्रह्मदेवाच्या चार मानसपुत्रांपैकी एक.
सुर - देव.
मी चाली लावलेले अनेक अभंग पंडित भीमसेन यांनी गायले. त्यांतले बरेच, खूपच लोकप्रिय झाले. त्यांतल्या काही अभंगांच्या संदर्भात 'तीर्थ विठ्ठल' सारख्या मजेदार आठवणी आहेत.

नामदेवांचा 'नामाचा गजर' हा अभंगही खूप गाजला. त्याची चाल यमन-यमनकल्याण रागावर आधारलेली आहे. मजा म्हणजे मी या अभंगाला चाल लावली होती, ती काहीशी बैरागी भैरवच्या स्वरूपाची होती. माझी एक सवय अशी आहे, की चाल बांधली की ती मी जवळपासच्या लोकांना ऐकवतो. काही श्रोते समजदार असतात. पण बर्‍याच वेळा ते सामान्य, म्हणजे गाण्याचा आनंद घेणारे इतपत असतात. मला वाटतं अशा श्रोत्यांची प्रतिक्रिया खूप मोलाची असते. जनता ती चाल कशी स्वीकारील याचं ते चांगलं गमक आहे. माझी बैरागी मधली चाल मी माझ्या धाकट्या मुलाला, माधवला म्हणून दाखविली. परमेश्वर कृपेने माझ्या सगळ्याच मुलांना गाण्याची आणि लयीची खूप समज आहे. पण ती बैरागी भैरववर आधारलेली 'नामाचा गजर' या अभंगाची चाल माधवला फारशी रुचली नाहीसं दिसलं. तसं त्यानं मला सांगितलं. म्हणून मी पुन्हा चाल लावण्यात गुंतलो. आणि आताची चाल साकार झाली. लोकांना ती खूप आवडते.

मुखड्यात धैवताला दिलेलं प्राधान्य एक विशेष वातावरण निर्माण करतं असं, माझे काही गायक मित्र म्हणतात. प्रसिद्ध कवयित्री सौ. संजीवनी मराठे यांनीही काहीशी याच जातीची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "गाणं ऐकताना तो भीमातीर आणि त्या ठिकाणी विठ्ठल नामाच्या गजरात हरवलेले वारकरी नजरेसमोर साकार होतात." गदिमांचं काव्य जसं चित्रमयी तसे तुमच्या चालीचे सूर या गाण्यात चित्रमयी होतात."
(संपादित)

राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.