वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
ह्मणती गौळणी हरीचीं पाउलें धरा ।
रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपतछपत येतो हरी हा राजभुवनीं ।
नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥
सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं ।
शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलों देवा ।
अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा ह्मणे केशवा अहोजी तुह्मी दातारा ।
जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥
गीत | - | संत नामदेव |
संगीत | - | मा. कृष्णराव |
स्वराविष्कार | - | ∙ मास्टर कृष्णराव ∙ पं. राम मराठे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, संतवाणी |
अंदु | - | पायातील साखळी. |
दावा | - | हक्क / फिर्याद. |
नवनीत | - | लोणी. |
पवाड | - | महती / कीर्ती. |
मावा (माव) | - | माया, मोहिनी, जादू / कपट / खोटेपणा, भ्रम. |
थांबते, असे तरी का म्हणावयाचे? कोणी तसा संतमहात्मा यापुढच्या काळात झाला, तर त्यालाही आपण या मालिकेत सहज बसवू शकू. ज्ञानेश्वर माउलींना पांडुरंगाचा अवतार मानणारी संतांची वचने उपलब्ध आहेत आणि गमतीची गोष्ट अशी की, कृष्णाने सांगितलेले भगवद्गीतेचे तत्वज्ञान मराठी या देशभाषेत आणणारे ज्ञानेश्वर महाराज हे पुन्हा एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे.
'द्वारकेचा राणा' तर कृष्णकारस्थानी म्हणूनच प्रसिद्ध. आपण मुळी 'कृष्णकारस्थान' असा शब्दच वापरतो आणि सुभदेच्या लग्नासाठी त्याने जे काय व्यूह रचले, ते रंगभूमीवर पाहताना आपणही रंगून जातो. पांडुरंगाच्या बाबतसुद्धा त्याच्या रंगेलपणाच्या, त्याच्या नाटकीपणाच्या अनेक कथा उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरमाउली मात्र या मालिकेत वेगळी उठून दिसते.
त्यांच्या बाबतीत असे काही बोलणे किंवा विचार करणेसुद्धा मराठी मनाला परवडणारे नाही. विष्णू, कृष्ण, पांडुरंग हे परब्रह्माशी नाते सांगत असतानाच किंबहुना परब्रह्माचे रूप म्हणून ओळखले जात असतानाच नेहमीच्या ऐहिक जीवनात कसे एकरूप झाले होते, ते आपल्याला दिसून येते. नामदेव महाराजांचा अभंग 'परब्रह्म निष्काम' हा या निर्गुणाचे सगुण रूप मोठे खुलवून सांगणारा आहे.
हा अभंग मास्तर कृष्णराव फार छान म्हणत. १९५१ च्या गणेशोत्सवात मी गिरगावातल्या ब्राह्मणसभेत मास्तरांनी म्हटलेला हा अभंग ऐकला आणि अक्षरश: नादावून गेलो. दुसर्या दिवशी सकाळीच फडके गणपतीच्या दर्शनाला गेलो आणि केवढा मोठा भाग्ययोग ! तेथे प्रत्यक्ष मास्तर कृष्णराव दर्शनाला आले होते, ते भेटले. कानांत त्यांचे गाणे होते आणि डोळ्यांसमोर त्यांचे रूप होते.
बावीस वर्षांचा मी मोठ्या धिटाईने मास्तरांच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि म्हटले, "तुम्ही काल गायिलेला परब्रह्म निष्काम हा अभंग पुन: पुन्हा ऐकावासा वाटतो, त्या श्रवणानंदातून बाहेर येऊ नये, असेच वाटते. तो अभंग पुन्हा ऐकण्याची संधी मिळावी, अशी इच्छा आहे.''
''मग ऐका की, कोलंबिया कंपनीने रेकॉर्ड काढली आहे.'' मास्तरांचे बोलणे मोठे मिस्कील असे. त्यांचे गाणे जेवढे रंगतदार तेवढे बोलणेही खमंग आणि आह्लाददायी. दोन गाण्यांच्यामध्ये मास्तर संभाषणाचे असे शब्द पेरीत की, श्रोते अधिकच आनंदून जात. तेव्हा माझ्याकडे ग्रामोफोनही नव्हता. मी ते गाणे ऐकण्यासाठी ग्रामोफोन घेतला, ती रेकॉर्ड घेतली आणि मनसोक्त ऐकली.
खरोखरच भगवान श्रीकृष्णाचे वर्णन करताना आपले संत कसे आनंदाच्या डोही डुंबत असत, त्याची प्रचिती मास्तर कृष्णरावांसारख्यांच्या गळ्यातून ऐकल्याशिवाय येणार नाही. भगवान श्रीकृष्ण लहानपणी वेगवेगळे खेळ करी, वेगवेगळ्या खोड्या करी. कृष्ण - पिता नंद हा राजा होता आणि यशोदा राणी होती. त्यांच्या मुलाला दह्यादुधाची चोरी करण्याची गरज काय? पण कृष्णाला चोरी केल्याशिवाय चैन पडत नसे. त्याच्या खोड्या सांगताना सगळे संत स्वत: तर रंगून जातातच, पण श्रोत्यांनाही रंगवून टाकतात.
सर्वांनाच बाळ - कृष्ण आपल्या घरात रांगतो आहे, असा भास होतो. संतांनी केलेली ही किमया सर्वांनाच आनंददायी ठरली असेल यात मुळीच शंका नाही आणि तो कृष्ण तरी किती लबाड, तो बाळकृष्ण आहे, गोपाळकृष्ण आहे, कृष्णकन्हय्या आहे, राधारमण आहे, मुरलीधर आहे, रणनीतिप्रवीण आहे, परमार्थातील अधिकारी योगिराज आहे आणि इतके सगळे असूनही तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे, पण निष्कामही आहे ! तो सगळीकडे आहे आणि कुठेही नाही ! खरोखरच कृष्णाची व्यक्तिरेखा हे प्राचीन भारतीय वाङ्मयातील एक अमोल लेणे आहे -
उगाच का त्याला 'पूर्णपुरुष' म्हणतात आणि 'पुरुषोत्तम' म्हणून गौरवितात?
(संपादित)
जयंत साळगांवकर
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (८ जुलै, २००७)
(Referenced page was accessed on 19 June 2015) इतर भावार्थ