A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पुण्य पर‍उपकार पाप ते

पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा ।
आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥

सत्य तो ची धर्म, असत्य तें कर्म ।
आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥२॥

गति तेचि मुखीं नामाचें स्मरण ।
अधोगति जाण विन्मुखता ॥३॥

संतांचा संग तोचि स्वर्गवास ।
नर्क तो उदास अनर्गळा ॥४॥

तुका ह्मणे उघडें आहे हित घात
जया जें उचित करा तैसें ॥५॥
गीत - संत तुकाराम
संगीत - राम फाटक
स्वर- पं. भीमसेन जोशी
राग - तोडी
गीत प्रकार - संतवाणी
अनर्गल(ळ) - बेबंद, बेछूट / स्वच्छंदी.
जोडा - तुलना.
वर्म - दोष, उणेपणा / खूण.
विन्मुख - तोंड फिरवलेला.
भावार्थ-

  • दुसर्‍यावर उपकार करणे हे पुण्य व दुसर्‍याला त्रास देणे हे पाप आहे. याशिवाय दुसरे पापपुण्य नाही.
  • सत्याने वागणे हा धर्म व असत्याने वागणे हा अधर्म आहे, पाप आहे.
  • याखेरीज धर्माचे दुसरे वर्म नाही.
  • मुखात देवाचे स्मरण करून नाव घेणे ही चांगली गती आहे. तसे स्मरण न करणे ही अधोगती आहे असे समजा.
  • साधुसंतांची संगत हा स्वर्गवास तर त्यापासून दूर जाणे हा नरक आहे.
  • तुकाराम महाराज म्हणतात, हित अणि अहित कोणते ते उघड दिसते. जे योग्य वाटेल ते करा.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.