A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रंगुनी रंगात सार्‍या

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा !

भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो;
अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा !

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
गीत - सुरेश भट
संगीत - सुधीर मोघे
स्वराविष्कार- देवकी पंडित
सुधीर मोघे
चंद्रशेखर गाडगीळ
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - भावगीत, कविता
तात्पर्य - सारांश, आशय.
'ध्रुपद आणि अंतरा' हा रूढ आकृतीबंध स्वीकारला आणि ध्रुपदातलं यमकनामक प्रकरण कडव्याच्या शेवटच्या ओळीत सांभाळलं की 'गीत' झालं, असं नाही. ते बनलेलं 'रसायन' गीत म्हणून खूपदा निकष्ट असतंच पण 'काव्य' म्हणूनही भिकार असू शकतं. आकृतीबंध कुठलाही असो, एक अंगभूत 'गीतपण' ज्या कवितेत झंकारताना जाणवतं ती कविता व्यक्तिगत असूनही 'गीत'ही ठरू शकते. ज्ञानेश्वर, तुकाराम नामदेवांपासून आरती प्रभु, ग्रेसपर्यंतच्या अनेकांची काव्यं 'गीत'स्वरूपातही आपल्या आयुष्यात सामावली ती त्या मधल्या, संगीतकरांचं चित्त वेधणार्‍या सुप्त 'गीत'पणामुळेच.

एका दिवाळी अंकात सुरेश भटांची एक सुंदर कविता वाचली आणि तिने जणू मानगूटचं पकडली. नेहमीप्रमाणे ती शंभरदा वाचून, तितक्याच वेळा इतरांना ऐकवूनही भागेना. मघाशी सांगितलेलं 'गीतपण'ही त्या कवितेत खरं तर सकृतदर्शनी नव्हतं. नाद-लयीची अनुभूती होती पण तरीही गीताला अवजड अशी एक उग्र, दाहक, आशयघनता त्या कवितेत ठासून भरली होती. स्वरांना निदान माझ्या दृष्टीने न झेपणारी. पण ती कविता नकळत माझ्याकडून स्वरबद्ध होऊन गेली. कविता 'गझल' जातीची होती. पण तसले काही संकेत मनात न आणता, एक लख्ख मराठी आणि शंभर टक्के 'खरी' कविता म्हणून मी तिच्याकडे पाहिलं. आणि तसाच तिला भिडलो. संगीतकार म्हणून आणि त्या संगीतकारात लपलेला कवी म्हणूनही..

कविता स्वरबद्ध झाल्यावर माझ्या भोवतीच्या वर्तुळात मी ती नवी रचना तडाकून गात राहिलो. त्या वर्तुळाचाही परीघ पाहता पाहता विस्तारत गेला. परिणामी मुंबई दूरदर्शनवर झालेल्या सुरेश भटांच्या 'प्रतिभा आणि प्रतिमा'मध्ये देवकी पंडीतच्या गळ्यातून ती साकार झाली आणि सर्वदूर पोचली. कवितेच्या या एकमेव प्रकट आविष्काराची अनेक प्रतिबिंबं अनेक मनात आणि गळ्यात उमटताना आजही दिसतात. या वीस-बावीस वर्षात ती एरव्ही कुठेही प्रकट झाली नाही. तिची ध्वनिमुद्रिका-कॅसेट काढाविशी वाटली नाही याची इतर कारणपरंपरा काय असेल ती असो, खरं कारण असं आहे की त्या मूळ कवितेच्या शब्दांतच एक अनिवार्य अट दडलेली आहे -

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा !
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे
सौजन्य- शुभदा मोघे

  इतर संदर्भ लेख

 

Print option will come back soon
Random song suggestion
  देवकी पंडित
  सुधीर मोघे
  चंद्रशेखर गाडगीळ