A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं । सृष्टिची विविधता पाहूं
त‍इं जननी-हृद्‌ विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठिं वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलों या तव वचनीं । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं या पुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मीं वेचियलीं या भावें । कीं तिनें सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आतां । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथें भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आतां । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते ! जी सरिता । रे
त्वद्‌विरहाची शपथ घालितों तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हंससि निर्दया कैसा । कां वचन भंगिसी ऐसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीतें । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभमि-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनीं एक क्षणिं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला
गीत - स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार- लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर
सुधीर फडके
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• काव्य रचना- १९०९, रत्‍नागिरी.
• स्वर - मंगेशकर कुटुंबीय, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर
• स्वर- सुधीर फडके, संगीत- सुधीर फडके
अगस्ती - महाभारतात अगस्ती ऋषींनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देव-दानव युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेला कालकेय हा दानव समुद्राच्या तळाशी जावून लपला. तेव्हा अगस्तींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयाला ठार मारले आणि देवांवरील संकट दूर केले.
उद्धरणं - उचलणे.
तइं - तेव्हा.
तम - अंधकार.
ती आम्रवृक्षवत्सलता - बाबाराव सावरकर.
तो बाल गुलाबहि - लहान भाऊ बाळ.
नवकुसुमयुता त्या सुलता - पत्‍नी, वहिनी, भगिनी या घरातील स्‍त्रिया.
पंजर - पिंजरा.
पृष्ट(ष्ठ) - पाठ.
पाश - जाळे.
फेन - फेस.
फुलबाग मला - भगूरचे घर, संपूर्ण कुटुंब.
मार्गज्ञ - मार्ग दाखवणारा.
मिष - निमित्त.
युत - युक्त, जोडलेले.
योगे - कारण.
लता (लतिका) - वेली.
वत्सल - प्रेमळ.
व्यय - खर्च.
विवासनं - हद्दपारी.
शुक - पोपट.
शक्त - समर्थ, शक्तियुक्त.
सुमन - फूल.
सरित्पति - समुद्र.
सरिता - नदी.
स्वये - स्वत:
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.
सांप्रत - हल्ली, सध्याच्या काळी.
नोंद
• 'अभिनव भारत' या संस्थेवर वक्रदृष्टी झाल्यामुळे अत:पार आपल्याला हिंदुस्थानला परतता येणार नाही नि आपण लवकरच धरले जाऊ, असें स्वातंत्र्यवीर सावरकरांना निश्‍चितपणे वाटले. त्यावेळी लंडनपासून साधारणपणे ८० कि.मि. दूर असलेल्या ब्रायटनच्या समुद्रकाठी ते गेले असता स्वजनांची आठवण होऊन त्यांनी ही कविता लिहिली.
• आम्रवृक्षवत्सलता - बाबाराव सावरकर
• नवकुसुमयुता - पत्‍नी, वहिनी, भगिनी या घरातील स्त्रिया
• बाल गुलाब - लहान भाऊ बाळ
• फुलबाग - भगूरचे घर, संपूर्ण कुटुंब
• मूळ कवितेत - 'जो आचमनी एक पळीं तुज प्याला' असे आहे.

संदर्भ-
सावरकरांची कविता
संपादक- वासुदेव गोविंद मायदेव
सौजन्य- केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर
  सुधीर फडके