या पदांत संलग्न केलेल्या बा. भ. बोरकर यांच्या दोन कविता (संपूर्ण)-
अंतर्बाह्य आतां आनंदकल्लोळ
आयुष्याची आतां झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा.
खडे, गोटे मज झाले चिंतामणी, दिसे तें तें पाणी गंगोदक.
लवे वृक्षवल्लीः कल्पद्रुमावली, इंद्ररंगावळी मेघमाळा.
वेल्हाळ पांखरें: गंधर्व-किन्नरें, वाहनें-वनचरें अमरांची.
जें जें भेटे तें तें दर्पणींचे बिंब : तुझें प्रतिबिंब लाडेंगोडें.
उमटल्या शब्दीं नवीन पहाट, पावलांत वाट माहेराची.
अंतर्बाह्य आतां आनंदकल्लोळ, श्वासीं परिमळ कस्तुरीचा.
सुखोत्सवीं अशा जीव अनावर : पिंजर्याचें दार उघडावें.
(काव्य रचना- बेती आल्त, ९ जुलै १९७९)
संतर्पणें
संधिप्रकाशांत अजून जों सोनें, तो माझी लोचनें मिटों यावी;
असावीस पास, जसा स्वप्नभास, जीवीं कासावीस झाल्याविण;
तेव्हा सखे आण तुळशीचें पान, तुझ्या घरीं वाण त्याची नाही;
तूंच ओढलेलें त्यासवें दे पाणी, थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें;
रंभागर्भी वीज सुवर्णाची कांडी, तशी तुझी मांडी देईं मज;
वाळल्या ओठां दे निरोपाचें फूल; भुलींतली भूल शेवटली;
जमल्या नेत्रांचें फिटूं दे पारणें, सर्व संतर्पणें त्यांत आलीं.
(काव्य रचना- बोरी, ११ जुलै१९७३)
पृथक्
मृत्यूचा उल्लेख असूनही उदात्त प्रेमाविषयी बोलणारी आणि अस्वस्थ करत करत हळूहळू अंतर्मुख करणारी ही कविता मला भेटली, त्या क्षणाचे मी पुन्हा पुन्हा आभार मानतो.
संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
मैफल.. मग ती गाण्याची असो वा जगण्याची, अजून थोडी हवी होती असं वाटत असतानाच संपायला हवी ! आयुष्याच्या संध्याकाळी अजून आकाशात थोड सोनं आहे, सूर्याची पालखी निघता निघता त्याने उधळलेले चार किरण अजून आकाशात आहेत, तोपर्यंत डोळे मिटावेत.. ही कविता वाचता वाचता गंभीर झालो होतो मी २००५ मध्ये. थेट मृत्यूवरची कविता आहे ही, असं स्वतःशी बोललोसुद्धा ! पण एका भेटीत ना माणूस कळतो ना कविता.
या दोन ओळींशी अनेक दिवस थांबलो होतो मी. आयुष्य योग्य वळणावर असताना, कोणीही त्या क्षणाची वाट पाहण्याआधीच ते संपावं, हा विचार देणारी ही कविता, एवढंच काय ते मनाशी बांधून पुढे निघालो होतो मी. एक दिवस पुन्हा बा. भ. बोरकरांची हीच कविता वाचताना पुढच्या ओळी शांतपणे वाचल्या आणि लक्षात आलं की ही कविता म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी मृत्यूकडे एखाद्या उत्सवासारखं बघणार्या माणसाचं मनोगत आहे आणि या मृत्यूच्या उत्सवाच्या परमोच्च क्षणी त्याला समोर हवी आहे- 'ती'
आयुष्यभर त्याच्याबरोबर असलेली 'ती' किंवा कधीही न भेटता सुद्धा आयुष्यभर जी बरोबर होती ती- 'ती'
असावीस पास, जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
अख्खा संदर्भच बदलून गेला या कवितेचा. आयुष्यात संध्याकाळी अजून थोडं सोनं आहे, खरंतर तर तुझं अस्तित्व आहे, हेच संध्याकाळच्या प्रहरी सुखावणारं आहे आणि तुझ्याकडे पाहत, तुझा हात हातात घेऊन माझा तो शेवटचा प्रवास व्हावा.. ह्यापेक्षा गहिरं, ह्यापेक्षा रोमँटिक अजून काय असू शकतं? जशी जशी कविता वाचत गेलो, वाचता वाचताच चालीत गुणगुणत गेलो, तसा तसा ह्या कवितेच्या प्रेमात पडत गेलो.
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे
तुझ्या हातून तुळशीचं पान हवंय आणि तू ओढलेल्या पाण्याचे दोन थेंब मिळावेत, तेच माझ्यासाठी गंगोदक आहे. तुळशीचा उल्लेख, ह्या नात्याला अजूनच सुंदर करतो, अजून पवित्र करतो.
'तूच ओढलेले पाणी' वाचताना, तू ज्या पाण्याचा घोट घेऊन ते उष्टं केलं आहेस असाही अर्थ वाटतो आणि तू तुझ्या हातानी विहिरीतून ओढून मला त्या पाण्याचे दोन थेंब दे. आयुष्यभर साथ देणार्या बायकोची कविताही वाटते आणि जी आयुष्यभर प्रेम व्यक्त करू शकली नाही तिचीसुद्धा. मृत्यूच्या क्षणी ती व्यक्ती समोर हवी, जी आयुष्यभर काळजाच्या जवळ होती, हे मात्र कवितेभर जाणवत राहतं.
वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली..
माझ्या ओठांना एकदा, शेवटची भूल दे. भूल.. जशी आयुष्यभर दिलीस आणि जी भूल दिल्यावर पुन्हा उठणार नाही अशी भूल..
एका चांगल्या कवितेचं गाणं झालं ह्याचा आनंद झाला आणि मी ते कार्यक्रमांत गायला सुरुवात केली. त्यानंतर वर्षभरात अगदी सहज पुन्हा एकदा 'चांदणवेल' हा बोरकरांच्या कवितांचा संग्रह वाचतांना 'संधिप्रकाशात' ह्या कवितेच्या पानाच्या मागच्या पानावरची कविता वाचली आणि एकदम डोक्यात काहीतरी काहीतरी चमकलं. कविता होती-
आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडेगोडे..
आणि मला जाणवलं की ह्या दोन कवितांमध्ये एक अंतर्गत नातं आहे, एक पूल आहे, ह्या दोन कवितांना जोडणारा. ज्यांच्या जगण्याची वाटचाल सामान्य असते त्यांचं आयुष्य वठतं आणि ज्यांना आपली वेगळी वाट सापडते त्यांच्या आयुष्याची 'उजवण' होते.. आणि ज्याच्या आयुष्याची उजवण होते तो त्या शेवटाजवळ पोचल्यावर त्याचा प्रत्येक क्षण आनंदाचा असतो, कारण त्याचं आयुष्य उजळून निघालंय, त्याला समजलंय, त्याला जाणवलंय.. 'तुझे तुज ध्यान कळों आले'.. अश्या माणसांच्या आयुष्याची उजवण होते. दर्पणात कुठल्याही गोष्टीचं प्रतिबिंब पाहायला जावं तर.. तूच आणि तूच दिसावीस.
उमटल्या शब्दी नवीन पहाट, पावलांत वाट माहेराची
अंतर्बाह्य आता आनंदकल्लोळ, श्वासी परिमळ कस्तुरीचा
आपली मूळ जागा जी आहे, तिथे माहेरी जाण्याची ही वेळ आहे. किती सोपी आणि उदात्त आहे ही मृत्यूची संकल्पना. पुन्हा आपल्या मूळ गावी जाणं, पुन्हा आपल्या घरी जाणं, जसं तुकोबा म्हणतात-
आपुल्या माहेरा जाईन मी आता
निरोप संतांहाती आला
आणि ह्या आनंदाच्या क्षणी अंतर्बाह्य आनंदकल्लोळ आहे आणि श्वासात कस्तुरीचा सुगंध आहे. मग परमोच्च आनंदाच्या क्षणी-
सुखोत्सवी अशा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे
आणि मग..
संधिप्रकाशात अजून जो सोने
दोन्ही कवितांचं मिळून एक गाणं झालं, केवळ तबला आणि तानपुरा एवढ्याच वाद्यमेळामध्ये हे गाणं ध्वनिमुद्रित केलं.
मृत्यूचा उल्लेख असूनही उदात्त प्रेमाविषयी बोलणारी आणि अस्वस्थ करत करत हळूहळू अंतर्मुख करणारी ही कविता मला भेटली, त्या क्षणाचे मी पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि ह्या बोरकरांच्या ह्या दोन उत्कृष्ट कवितांचा आणि माझ्या चालीचा खर्या अर्थाने सन्मान झाला, जेव्हा माझं हे गाणं लतादीदींनी गायलं. त्या गाण्याला प्रत्यक्ष सरस्वतीचा आशीर्वाद मिळाला !
(संपादित)
सलील कुलकर्णी
सदर- कवितेचं गाणं होताना
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (३० एप्रिल, २०१७)
(Referenced page was accessed on 08 August 2025)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख