A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सोनार शिक्का नवा निघाला

सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥

वडाची साल पिंपळाला लावितां कसी लागेल पहा शोधून ।
हेल्यावर जरी दिली अंबारी मटकन बसेल भारानें ।
पखाल आपण वाहूं विसरला घरोघरच असेल गाणं ।
हिजडे जर तलवार मारते शिपायांशी पुसतें कोण ।
उदंड झाला ताजा गधडा याला शोभेल काय वर जिणं ।
कोल्हे कुत्रे भुंकू लागले हत्ती पळेल काय भिऊन ।
भीक मागून पित्रं घालशी तर स्वर्गी कैसा वाजेल घंटा ।
सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥

कसे मुंगीला पर फुटले घेऊ म्हणती गगन ।
गरुडाची सर याला टिटवी गेली गर्वानें ।
हनुमंतापुढें उडी माराया पण केला कोल्हानें ।
उडी मारीतां धरणीशी पडला झालं बावन गेलें अवसान ।
श्रावणमासा शिदड मातले शेषागरी नेऊं लग्‍न ।
चित्र वैशाखांत या म्हणून म्हटले तिकडेंच गेले मरुन ।
ताड म्हणतो मी मेरुहून उंच कैलासाशी लावीन फाटा ।
सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥

राजहंसाच्या पंक्ती बसाया गर्वे गेला कावळा ।
जातां खेपे टोचून पाहे जड लागे माणिक गोळा ।
बेडुक म्हणे मी वेद पढतों डबकामधीं खरडी गाळा ।
मैना सारख्या रडूं लागल्या नित्य रडती वटवाघुळा ।
कोणी कोणाचा गुरु ना चेला घरोघरचे झाले गोळा ।
शिलंगणाचे सोनें आनूं आठ रूपयांचा म्हणे तोळा ।
जसे शिमग्याचे वीर घुमती फौजाचा करिती सपाटा ।
सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥

तळहातानें चंद्र झांकेना उजेड त्याचा बहुजागा ।
मोत्याच्चा लडींत सरजा दमडीचा तो माल फुगा ।
गुरु गुरकावी चेला टरकावी मात्रागमनी असेल बगा ।
परस्परें जग देत ग्वाही अपकीर्ति माहीत जगा ।
कथा भागवत शास्त्र पुराण हरीचे गुण कोणी गागा ।
नामें विठ्ठलचे असे धडाके ऐकून मूर्खा होय जागा ।
येसू परशराम म्हणे अशिलाचा पोकळ ताठा ।
सार्‍या गांवाचे ओहोळ मिळून गंगेची करिती थट्टा ।
सोनार शिक्का नवा निघाला पंधरा आणे जरी बट्टा ॥
गीत - शाहीर परशराम
संगीत - वसंत पवार
स्वराविष्कार- पं. वसंतराव देशपांडे
सुलोचना चव्हाण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - शाहीर परशुराम
गीत प्रकार - चित्रगीत, लोकगीत
  
टीप -
• स्वर- पं. वसंतराव देशपांडे, संगीत- वसंत पवार, चित्रपट- शाहीर परशुराम.
• स्वर- सुलोचना चव्हाण, संगीत- ???.
गधडा - गाढव.
पखाल - पाणी भरण्याची चामड्याची मोठी पिशवी.
बावन - फिजिती.
मेरू - एक पर्वत.
शिदड - गांडूळ.
हेला - रेडा.
पृथक्‌
पं. वसंतराव देशपांडे आणि सुलोचनाबाई चव्हाण या दोघांच्या स्वराविष्कारांत शब्दांचा बराच फरक असल्याने येथे शाहीरांचे मूळ शब्द दिले आहेत.

  पृथक्‌

 

  पं. वसंतराव देशपांडे
  सुलोचना चव्हाण