ह्या गाण्याची कथा सांगाविशी वाटते. बर्याच वर्षांपूर्वी 'मुलगी' या नावाचं एक नाटक श्री. आत्माराम सावंत यांनी लिहिलं होतं. ते जसे नाटककार होते तसे कवीसुद्धा होते. त्या नाटकात एका प्रवेशात मैफिलीत अदा करून नायिका गाणं पेश करते, असं दाखवायचं होतं. त्याकरता त्यांनी हे गीत लिहिलं. संगीत दिग्ददर्शन माझं असल्याने, अदा करून गाणं करायचं व मैफलीचा ढंग यायला पाहिजे म्हणून ठुमरीचा डंग यावा अशा पद्धतीची चाल मी बांधली. ते नाटक बर्याच वर्षांपूर्वी झालं.
गाण्याचं रेकॉर्डिंग नंतर झालं. जेव्हा रेकॉर्डिंग करायचं ठरलं, तेव्हा ठुमरीचा ढंग प्रभावीपणे गाऊ शकणार्या अशा त्या काळातील एकमेव गायिका माणिक वर्मा, त्यांचंच नाव माझ्या डोळ्यांसमोत आलं. त्यांची शास्त्रीय गायनाची तयारी व आवाजाची विशिष्ट लकब यामुळे त्यांनी गायलेलं हे गाणं सहजपणे मनाची पकड घेतं, सुंदर चाल, सुंदर गायन व सुंदत काव्य हा त्रिवेणी संगम या गाण्यात झाला आहे.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
आपण सर्व भारतीय खूप भाग्यवान आहोत की आपण भारतीय शास्त्रीय संगीताच्या महान परंपरेचे पाईक आहोत. अतिशय समृध्द असं आपलं भारतीय शास्त्रीय संगीत हे विविध संगीत प्रकारांच्या उगम स्थानी आहे आणि त्याचे उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, असे उपयोजित संगीत प्रकार म्हणजेच सोप्या भाषेत अपत्ये आहेत. ही अपत्ये, हे उपयोजित संगीत प्रकारही अतिशय समृध्द आहेत. या तिन्ही संगीत प्रकारातील दिग्गजांची संख्या एवढी मोठी आहे की सगळी उधृत करणं केवळ अशक्य आहे. एक मात्र नक्की की यातील समाईक नावं फारच थोडी आहेत. याचं कारण या सगळ्या प्रकारांची आपापली खास वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांचं मूळ हे शास्त्रीय संगीत आहे एवढी एकच समान गोष्ट सोडली तर हे तिन्ही संगीत प्रकार मांडणीत स्वतंत्र आहेत आणि भिन्नही आहेत. त्यामुळे एकाच कलाकाराला सर्व संगीत क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करणे खूप कठीण आहे. परंतु अशी काही मोजकी नावं आहेत की ज्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम अशा सगळीकडे प्रभुत्व मिळवलं. यश, लोकप्रियता, मान्यता मिळवली. अशा अगदी हाताच्या बोटांवर मोजण्यातलं एक नाव म्हणजे महान गायिका- माणिक वर्मा.
अनेक शास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवलेल्या, उपशास्त्रीय संगीत प्रकार गायलेल्या आणि सुगम संगीतातली अनेक लोकप्रिय भावगीतं, भक्तीगीते, अभंग ज्यांच्या नावावर आहेत अशा त्यांच्यासारख्या त्याच ! माणसात साधेपणा असावा पण इतकाही नाही की जो त्यांच्यात होता. या साधेपणामुळे कधीकधी असं वाटतं की आपण किती श्रेष्ठ आहोत याची या मोठया लोकांना कल्पनाच नसते बहुतेक. माणिक वर्मांच्या अनेक लोकप्रिय गाण्यातलं एक म्हणजे, 'त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग'. याचे गीतकार आहेत आत्माराम सावंत आणि संगीतकार दशरथ पुजारी.
वसंत वाळुंजकर यांनी शब्दांकित केलेल्या, 'अजून त्या झुडुपांच्या मागे' या दशरथ पुजारींच्या आत्मचरित्रात दशरथ पुजारींनी या गाण्याविषयीची अशी हकीकत सांगितली आहे.
या गीताचे कवी आत्माराम सावंत हे एक नाटककारही होते. त्यांनी त्यांच्याच 'मुलगी' नावाच्या एका नाटकासाठी हे गीत लिहिलं होतं. नाटकाच्या दृश्यातली नायिका तिच्या अदाकारीने हे गीत सादर करते. संगीतकार दशरथ पुजारींनी त्यानुसार उपशास्त्रीय संगीत प्रकारातल्या ठुमरी बाजाची चाल त्या शब्दांना लावली. जेव्हा याच गाण्याची ध्वनिमुद्रिका काढायचं ठरलं तेव्हा अशा ठुमरी बाजातल्या गायिकेचा विचार सुरु झाला. दशरथ पुजारींना अशा बाजासाठी तत्काळ एकच नाव आठवलं, माणिक वर्मा. स्वतः दशरथ पुजारी हे शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना पूर्ण विश्वास होता की अशा ढंगाच्या गायकीला शास्त्रीय बैठक भक्कम असलेल्या परंतु गीताच्या शब्दांना न्याय देणार्या केवळ माणिक वर्माच आहेत. माणिक वर्मांनीही संगीतकाराचा विश्वास सार्थ ठरवला आणि एक गोड भावगीत त्या गायल्या, 'त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग. न कळे मनास आता त्या आवरू कसे ग'
दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर जोडीची जशी सुंदर भावगीते आहेत तशी दशरथ पुजारी–माणिक वर्मा यांचीही अवीट गोडीची भावगीते आहेत. 'जनी नामयाची रंगली कीर्तनी' 'क्षणभर उघड नयन देवा' 'नका विचारू देव कसा' ही त्यातली काही अजरामर गीते. माणिक वर्मांच्या गायकीची एक असामान्य गोष्ट म्हणजे सहजता. त्यांच्या सगळ्या गाण्यांत शास्त्रीय संगीताने सांगितलेले सर्व गायन पैलु, गायकीचे अलंकार आहेत. त्यांत गमक आहे, मींड आहे, खटका आहे, तान आहे, मुरकी तर खूपच आहे. हे सगळं सादर करताना माणिकबाई अतिशय सहजपणे साकारतात, जणू काही त्या आपल्याशी गप्पाच मारताहेत. त्यांचं कुठलही गाणं बघा, त्यांच्या गायकीत कुठलाही अभिनिवेष नसतो. शास्त्रीय संगीताचे खोलवर संस्कार झालेल्या गायकाला असा गळा हलका करून गाणं हे खूप अवघड असतं, पण माणिकबाईंना ते सहज साध्य झालं आणि म्हणून त्यांची गाणी रसिकांना आपली गाणी वाटली, गुणगुणावीशी वाटली. पण गुणगुणणे एवढंच ठीक आहे कारण ती रीतसर गाणं हे खूपच अवघड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सुगम गायकीत सर्वसाधारणपणे आढळून येणारा उंच स्वराचा किंवा टिपेचा आवाज त्यांचा नव्हता. असं असूनही त्यांच्या नैसर्गिक आवाजाच्या व्याप्तीचा म्हणजे रेंजचा योग्य वापर त्यांनी केला आणि त्यांच्या संगीतकारांनी करून घेतला. त्यांचं गायन जसं सहज तसं त्यांचं वागणं, बोलणंही अतिशय नम्र, ज्याचा खास उल्लेख पुजारीजींनी केला आहे.
अशा या थोर गायिकेविषयी, त्यांच्या गाण्यांविषयी कितीही बोललं तरी ते अपुरच आहे. गाण्यामागच्या या काही गोष्टी महान संगीतकार दशरथ पुजारींनी सांगितल्या आणि वसंत वाळूंजकरांनी त्या शब्दांकित केल्या यासाठी त्यांचे शतशः आभार !
प्रमोद रानडे
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.