A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वारियाने कुंडल हाले

वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ॥१॥

राधा पाहून भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी ॥२॥

फणस जंबीर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ॥३॥

हरि पाहून भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥

ऐसी आवडी मिनली दोघां । एकरूप झाले अंगा ॥५॥

मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ॥६॥
कुंडल - कानात घालायचे आभूषण.
जंबीर - लिंबाची एक जात.
डेरा - रांजण.
डोळे मोडणे - डोळ्यांनी खुणा करणे, नखर्‍यांनी पाहणे.
दुभणे - पान्हा सोडणे, दूध देणे.
दाटा - भीती दाखविणे.
मिनणे - एकत्र होणे / प्राप्‍त होणे.
मूळ रचना-

फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नारंगी ॥१॥
वारियानें कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ॥।२॥
राधा पाहून भुलले हरी । बैल दुभे नंदाघरी ॥३॥
हरी पाहूनि भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥
मन मिनलेसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥

भावार्थ-

यमुनेवरून येणारे वारे राधेच्या कानातील कुंडले हलवित आहेत. ती इकडेतिकडे पाहात डोळे उडवत मोडत चालते. राधेचे एकूण चालणेही मोहकच आहे. तिला पाहून श्रीहरी भुलले. मधुरा भक्तीचे हे अगदी सुरेख वर्णन आहे. शृंगारातील नर्मविनोद सुद्धा नाथमहाराजांनी येथे साधला आहे. राधेची भूल एवढी पडली की हरी बैलाचे दूध काढावयास गेला. हरी पाहून भुललेली राधिका आपल्या मंदिरी जाऊन रिकामाच डेरा घुसळु लागली. त्या दोघांची मने एकमएकांशी मिसळून गेली होती. प्रेमात मनाचेच तर महत्वाचे काम. जो मन जिंकतो तो प्रिय होतो आणि मन जिंकते ती प्रेमळा. हरी राधेला प्रिय आणि राधिका हरीला प्रेमळा. तिच्या हृदयात त्याचा ठाव व त्याच्या हृदयात हिचा भाव असे प्रेमाचे अगदी अद्वैत झालेले असते. या प्रेमाचा दंश झाला की राधा ही राधा राहात नाही आणि हरी आपले हरीपण विसरून जातो. ती स्वत:ला शोधायला निघते आणि हरीला सापडते आणि हरी तिला भेटायला निघतो तेव्हां स्वत:लाच हरवतोही.. सापडतोही.. आणि भगवान असल्यामुळे पुन्हा दशांगुळे उरतोही. अशा या भगवंताचे प्रेम राधिकेला लाभले हे तिचे भाग्य होय. याचे कारण तिनेही त्याला प्रेम अर्पिले होते. म्हणून हे तिचे प्रेमभाग्य होय असे म्हणावे लागेल.

एकनाथ महाराजांनी जनार्दनांना जसे सर्वस्व मन:पूर्वक अर्पण केलेले होते तसेच या दोघांनी एकमेकांना. जसा एकनाथ सद्गुरूला भुलला तसे हे दोघे एकमेकांस भुलले.

व्यंकटेश कामतकर
सार्थ भारूडे
सौजन्य- धार्मिक प्रकाशन संस्था, मुंबई

  इतर भावार्थ