A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वेडात मराठे वीर दौडले

म्यानातुन उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजुस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वार्‍यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !
गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा, कविता
  
टीप -
• काव्य रचना- १९३६, नाशिक.
उल्का - आकाशातून पडलेला तारा.
खग - पक्षी.
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.
पात - रेघ / ओळ.
म्यान - तलवारीचे घर.
रिकीब (रिकब) - घोड्यावर चढण्यासाठी व बसून पाय ठेवण्यासाठी दोन बाजूंस सोडलेल्या कड्या.
नोंद
'विशाखा' या कुसुमाग्रजांच्या कवितासंग्रहात या कवितेच्या सुरुवातीला दिलेली टीप-
शिवाजी महाराज यांचा सेनापती प्रतापराव गुजर याचा एके ठिकाणी पराभव होऊन तो पळाला. ही वार्ता समजताच रागाच्या भरात त्यांनी सेनापतीला एक निर्भत्सनात्‍मक पत्र लिहिले. ते वाचून आलेल्या उद्वेगाच्या आवेशात प्रतापरावाने सात सरदारांसह थेट शत्रूच्या छावणीत प्रवेश केला. या वेड्या प्रयत्‍नामध्ये ते सातही वीर प्राणांस मुकले !

कवितेची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या पत्रापासून आहे.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.