A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देव ह्मणे नाम्या पाहें

देव ह्मणे नाम्या पाहें । ज्ञानदेव मीच आहें ॥१॥

तो मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥

माझ्या ठायीं ठेवीं हेत । सोड खंत खंडी द्वैत ॥३॥

नाम्या उमज मानसीं । ऐसें ह्मणे हृषिकेशी ॥४॥

आत्मरूपी ज्ञानेश्वर । तोचि ज्ञानाचा सागर ॥५॥

ज्ञानदेवें धरीं भाव । स्वयें होसी तूंचि देव ॥६॥
ठाय - स्थान, ठिकाण.
हेत - इच्छा.
नामदेवांच्या दोन स्वतंत्र रचना एकत्र करून हे पद तयार झाले आहे. त्या रचना अशा आहेत-

(१)
देव ह्मणे नाम्या पाहें । ज्ञानदेव मीच आहें ॥१॥
तो आणि मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥
माझ्या ठायीं ठेवीं हेत । सोड खंत खंडी द्वैत ॥३॥
नाम्या उमज मानसीं । ऐसें ह्मणे हृषिकेशी ॥४॥

(२)
ज्ञानदेवा पुढें कथा । करीं वारील ह्या व्यथा ॥१॥
आत्मरूपी ज्ञानेश्वर । तोचि ज्ञानाचा सागर ॥२॥
ज्ञानदेवें धरीं भाव । स्वयें होसी तूंचि देव ॥३॥
राम कृष्ण रे गोविंद । जप ह्मणे तो मुकुंद ॥४॥


बहात्तर वर्षांपूर्वी इंद्रायणीकांठच्या देवाच्या आळंदीत एक मूल जन्माला आले. सौंदर्य आणि संगीत याचे वरदान जणू त्याला उपजतच लाभलेले होते.

वयाच्या दहाव्या वर्षी ते चुणचुणीत मूल मराठी रंगभूमीवर आले. त्याने रंगभूमीवर प्रवेश केला तोही प्रत्यक्ष विठ्ठलाचा वेष घेऊन. ती विठ्ठलाची भूमिका वठविताना त्याने आपल्या देवदत्त गळ्याने एक पद गायले.

त्या पदाने सार्‍या रसिकतेला वेड लावले. कै. भास्करबुवा बखल्यांसारखा संगीतमहर्षीही या मुलाकडे आकर्षिला गेला. बुवांनी अत्यानंदाने त्या बालनटाला आपले शिष्यत्व बहाल केले. देणार्‍याने प्रसन्‍न होऊन दिले. घेणार्‍याने प्रसादप्राप्तीच्या आनंदाने त्याचा स्वीकार केला. मूळचा गळा तल्लख, लवचिक, हवा तसा फिरू शकणारा. फार गोड.

शास्‍त्रीय संगीताच्या प्रसारासाठी भास्करबुवांनी रंगमंचाचे व्यासपीठ उपयोगांत आणले. कृष्णराव फुलंब्रीकरांनी (उर्फ मास्तर कृष्णराव) आपल्या गुरुचीच परंपरा मोठ्या निष्ठेने सांभाळली. संवर्धित केली. संपन्‍न केली. प्रत्यक्ष गुरुनेच संस्कारित केलेला गंधर्वांचा गळा मास्तरांच्याही कामी आला. कै. बालगंधर्वांसाठी त्यांनी अनेक स्वररचना सिद्ध केल्या. स्वतःही संगीताची तपश्चर्या अखंड चालू ठेवली. गायक म्हणून अलौकिक यश मिळविले.

संगीतदिग्दर्शक हा शब्द कचकड्याच्या युगातला. नाटकमंडळ्यांच्या भरजरी काळातच मास्तरांनी सोनेरी स्वरांची अनेक महावस्‍त्रे विणली. नाट्यसुंदरीच्या सार्‍या हौशी पुरवल्या. स्वतःही रंगभूमीवर उत्तम भूमिका वठवल्या. गंधर्वांच्या 'कान्होपात्रा' नाटकाने मास्तरांच्या स्वररचनेला एका आगळ्या रंगाची झांक लाभली. संगीताच्या जरीपटक्याला एक भगवा समानधर्मा मिळाला. भास्करबुवांनी रंगमंचावर आणलेले संगीत - रंगमंदिराच्या पायर्‍या उतरून थेट समाजांत आले. मंदिरामंदिरांत निनादू लागले. शास्‍त्रीय रागरागिण्या भगवंताचे नाम आळविण्यात सुख मानू लागल्या. कै. नारायणराव गंधर्वांना देखील टाळ मृदुंगाचा छंद जडला, तो या कान्होपात्रेपासूनच.

शास्‍त्रीय संगीताच्या सुवर्णपात्रात भक्तीचा महारस भरण्याची महान कामगिरी मास्तरांचीच हे मनःपूर्वक म्हटले पाहिजे. 'अगा वैकुंठीच्या राया', 'पतित तू पावना', 'परब्रह्म निष्काम', 'देव म्हणे नाम्या पाहे' इत्यादि त्यांच्या भक्तिगीतांचे स्वर अजूनही सुकलेले नाहीत. त्यांचा घमघमाट या महाराष्ट्र देशांत अखंड दरवळतो आहे.

यशस्वी नट, तपस्वी संगीतकार, तज्ज्ञ गायक आणि इतक्यावरही काळाबरोबर चालणारा चिरतरुण कलावंत ही मास्तरांची रास्त बिरुदावली. चित्रपटाच्या युगांतील प्रभातकाळ आठवावा. तेव्हाचा दिशा धुंद करणारा संगीताचा दरवळ खास मास्तरांचाच होता. अमरज्योती, गोपालकृष्ण, माणूस इत्यादि चित्रपटांचे संगीत मास्तरांचेच होते. 'सुनो सुनो बनके प्राणी' हे पद हिंदुस्थानभर गाजले होते. 'गोपालकृष्ण' हे चित्र तर एक अविस्मरणीय ऑपेरा होता.

मास्तरांनी हजाराच्यावर चाली बांधल्या. हजारो मैफिली गाजविल्या. संगीतकलानिधि ही उपाधी थिटी वाटावी, अशी अमोल कामगिरी त्यांनी बजावली. गंधर्वाला 'गाणी' देणारा हा थोर गायक, संगीतकार.

मास्टर कृष्णरावांनी स्वतः गायिलेली अकरा ध्वनिमुद्रित भक्तिगीते या मुद्रिकेवर आहेत. चिरकाल दरवळत राहील असा हा एक पुष्पगुच्छ. प्रत्येक फुलाचे सौंदर्य वेगळे. सुगंध वेगळा. या फुलांना कोमेजणे माहित नाही. यांचा सुगंध आजच्यापेक्षा उद्या अधिक. यांना लय आहे. वय नाही.

- ग.दि.माडगूळकर

('संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव मराठी भक्तिगीतें' या  सन १९७० मध्ये HMVने प्रकाशित केलेल्या ध्वनीमुद्रिकेवर त्या ध्वनीमुद्रिकेमधील मास्तरांच्या गाण्यांविषयी व मास्तरांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाविषयी कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी केलेले हे लिखाण छापले आहे.)

  इतर संदर्भ लेख