A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पसायदान

आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ।

तेथ ह्मणे श्री विश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• सार्थ ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी क्रमांक १७९३ - १८०१
अनवरत - सदोदित.
अर्णव - सागर, समुद्र.
आरव - अरण्य, बाग.
खल - अधम, दुष्ट.
चेतना - जीवनशक्ती / अंत:प्रेरणा / स्फूर्ती / ऊर्जा.
दुरित - पाप.
पसाय - प्रसाद.
मांदियाळी - समुदाय.
रती - प्रीती.
लांछन - डाग / कलंक.
लाहणे - लाभणे, मिळणे.
व्यंकटी - वक्रता / वाकडेपणा, कुटिलपणा.
वांच्छा - इच्छा.
चलां- चालतेबोलते
पीयूष- अमृत
सोयरे- आवडते

• आता सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर, त्याने त्या माझ्या वाग्‌यज्ञरूप सेवेने प्रसन्‍न होऊन माझ्यावर हा प्रसाद करावा.
• खल (दुष्ट) लोकांच्या दुष्ट बुद्धीमध्ये पालट पडून त्यांना सत्कार्माची आवड उत्पन्‍न व्हावी व सर्व भूतांच्या ठिकाणी परस्परांबद्दल मित्रभाव नांदावा.
• पातकरूप अंधकाराचा नाश होऊन जगात धर्मरूप सूर्याचा उदय व्हावा व प्राणिमात्रांच्या सदिच्छा फलद्रूप होवोत.
• ईश्वर-निष्ठांचा समुदाय भूतलावर सकल मांगल्याचा अखंड वर्षाव करीत असलेला सर्व भूतांना भेटो.
• ती संतमंडळी म्हणजे चालतेबोलते कल्पतरूंचे बगीचे आहेत, सचेतन असे चिंतामणीचे गाव व अमृताचे बोलते समुद्रच आहेत.
• निष्कलक चंद्र, ताप न देणारा (शांत) सूर्य, असे जे सज्जन, ते सर्व लोकांच्या प्रेमाचे स्थान असोत.
• किंबहुना, त्रैलोक्य सुखी होऊन, त्यांनी विश्वपालक जो आदिपुरुष, त्याचे अखंड भजन करावे.
• आणि विशेषत: येथे हाच ग्रंथ ज्यांनी आपले उपजीव्य (जगण्याचे साधन) मानले आहे (सर्वाधा तारक), त्यांना दृष्ट व अदृष्ट विजय सुखाचा लाभ घडत जावा.
• तेव्हा सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथ प्रसन्‍न होऊन म्हणाले 'तथास्तु'; तुझी ही इच्छा सफल होईल, असा माझा तुला प्रसाद (आशीर्वाद) आहे; त्यायोगे श्री ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले.

संदर्भ स्‍त्रोत- वै. ह. भ. प. मामासाहेब दांडेकर कृपाप्रासादिक 'सार्थ श्रीज्ञानेश्वरी'

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ