कालिंदी-तट-पुलिन-लांच्छित सुरनुतपादारविंद, जयजय ॥
उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद, जयजय ॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद, जयजय ॥
गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वराविष्कार | - | ∙ शरद जांभेकर ∙ रामदास कामत ∙ प्रभाकर कारेकर ∙ पं. भीमसेन जोशी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | सौभद्र |
राग | - | यमन |
चाल | - | विठाई माउली |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
अण्ड | - | ब्रह्मांड. |
अनघ | - | पापरहित. |
अरविंद | - | कमळ. |
अरि | - | शत्रु. |
अलिंद | - | घराच्या पुढचा ओटा. |
उद्धृतनग | - | गोवर्धन पर्वत. |
कुविंद | - | विणकर (कोष्टी). |
कालिंदी | - | यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते. |
पुलिन | - | वाळू. |
मधु-कैटभ | - | मधु व कैटभ हे विष्णू निजला असता त्याच्या कानातून उत्पन्न झाले. हे ब्रह्मदेवास भक्षणार होते, इतक्यात विष्णूने त्यांना ठार मारले. |
मिलिंद | - | भ्रमर, काळा भुंगा. |
रमण | - | पती. |
सत्यप | - | ब्रह्मदेव. |
सुर | - | देव. |
राधा-अधर-मधु-मिलिंद । जयजय रमा-रमण हरि गोविंद ॥
कालिंदी-तट-पुलिन-लांच्छित सुर-नत-पद-अरविंद, जयजय ॥
उद्धृतनग मधु-अरि-दम-अनघ सत्यप-अण्ड-पट-कुविंद, जयजय ॥
गोप-सदन-गुरु-अलिंद-खेलन बलवत् (बलवंत- खुद्द नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर)-स्तुति-तें न-निंद, जयजय ॥
'खेळ चालू राहिलाच पाहिजे' हे तर रंगमंचावरचं पहिलं सूत्र. एका दौर्यातला प्रसंग आहे.
'संगीत सौभद्र'चे प्रयोग चालू होते. त्यात नारदाचं काम करणारा नट आजारी पडला. प्रयोगाची तर वेळ झालेली. बाबांना प्रश्न पडला, आता नारदाचं काम कोण करणार? नाटकात नारदाला संवाद तर होतेच आणि 'पावना वामना या मना', 'राधाधरमधुमिलिंद' अशी गाणीही होती. दीदी कुठूनशी आली. बाबांसमोर उभी राहिली. बाबांना काही कळेना.
"बाबा, मी करते नारदाचं काम." दीदी म्हणाली.
"अगं, पण नारदाला संवाद आहेत आणि गाणीही." बाबा आपल्याच नादात होते.
"मला पाठ आहेत; संवादही आणि गाणीही. करते मी काम. आणि बाबा, आज मी तुमच्यापेक्षा एक वन्समोअर जास्त घेणार." चिमुरडी दीदी पुन्हा आत्मविश्वासानं बाबांना म्हणाली. बाबांना काय वाटलं कुणास ठाऊक. त्यांनी तिला नारदाचा वेश करायला सांगितलं.
भगवे कपडे, हातात लहानशी तंबोरी, डोक्यावर केसांचा बुचडा, गळ्यात माळा, पायात खडावा अशा थाटात दीदीनं रंगमंचावर प्रवेश केला. समोर अर्जुन म्हणून बाबा. नारद अर्जुनाच्या कंबरेच्या उंचीचा.
आणि दीदीनं नुसती वेळ मारून नेली नाही; तर खरंच बाबांपेक्षा जास्त वन्समोअरही घेतले.
(संपादित)
मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' या पुस्तकातून.
शब्दांकन- प्रवीण जोशी
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.